जिल्हाधिकाऱ्यांनी घडविले माणुसकीचे दर्शन

PBN05GPP02
PBN05GPP02

परभणी ः अस म्हणतात की, कोणाच्या मनात घर करायचे असेल तर ते पोटाच्या मार्गाने करावे लागते. पोटाच्या मार्गाने मनात झालेला शिरकाव हा ऋणानुबंध वाढविणारा असतो. घरात स्वयंपाकी म्हणून कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या मुलीच्या लग्नात जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी अचानक भेट देऊन या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला आश्चर्याचा धक्का दिला. केवळ लग्नात हजरच राहिले नाही तर मुलींच्या आई - वडिलांना ‘सबकुछ ठिक है ना, कुछ अडचण तो नही है ना..?' अशी आपुलकीची विचारपूस करून माणुकसीचे दर्शनही घडविले.
परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या घरी निर्मला नामदेव मोरे - मारकळ या स्वयंपाकी म्हणून कार्यरत आहेत. गेल्या २५ वर्षांपासून निर्मला मोरे या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात स्वयपांकी म्हणून काम करतात. त्यानंतर त्यांची बदली जिल्हाधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानी करण्यात आली. त्या ठिकाणी त्या गेल्या पाच महिन्यांपासून सेवा देत आहेत. निर्मला मोरे-मारकळ यांच्या स्वयंपाकाची चव जिल्हाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना इतकी भावली की त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. त्यामुळे अल्पावधीत निर्मला मोरे यांचे पी. शिवशंकर यांच्या घरातील स्थान सदस्यासारखेच झाले.

लग्नास येण्याचा आग्रहदेखील केला

निर्मला मोरे - मारकळ यांची मुलगी वर्षा हिचा विवाह शहरातील वैभवनगरमधील रहिवाशी मारोती जाधव या व्यवसायिक युवकाशी जमला. (ता.तीन) डिसेंबर रोजी येथील कौस्तुभ मंगल कार्यालयात हा विवाह पार पडला. मुलीचा विवाह असल्याने साहजिकच निर्मला मोरे - मारकळ व त्यांचे पती सतीश मारकळ यांनी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना मुलीच्या लग्नाचे आमंत्रण दिले व लग्नास येण्याचा आग्रहदेखील केला. परंतु, जिल्हाधिकारी पदावरील अधिकारी आपल्या मुलीच्या लग्नात आशीर्वाद देण्यासाठी येतील का, अशी पुसटशी कल्पनादेखील त्यांच्या मनात आली नाही.

हजेरी अचंबित करून गेली

(ता.तीन) डिसेंबर रोजी कौस्तुभ मंगल कार्यालयात लगिनघाई सुरू होती. वधू - वर उपस्थितांच्या शुभेच्छा स्वीकारत होते. तर वधूचे आई - वडील आलेल्या पाहुण्यांच्या पाहुणचारात मग्न होती. त्याच वेळी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांची अचानक लग्न मंडपात लागलेली हजेरी सर्वांचा अचंबित करून गेली. जिल्हाधिकारी लग्नाला आले आहेत ही चर्चा विवाहस्थळी पसरली. मग सर्वांचीच धावाधाव झाली.
---------------
जिल्हाधिकाऱ्यांनी वधू - वरांची व्यासपीठावर घेतली भेट
-----------------------
जिल्हाधिकाऱ्यांनी वधू - वरांची व्यासपीठावर जाऊन भेट घेतली. त्यांना आशीर्वाद दिले आणि ते निघाले. परंतु, जाता-जाता त्यांनी ‘अरे, निर्मलाताई कहा है?’ असे विचारले असता निर्मला मोरे यांचे भाऊ रामा मोरे यांनी तातडीने निर्मला यांना लग्नमंडपात घेऊन आले. जिल्हाधिकाऱ्यांनी वधू माता- पित्यांची भेट घेऊन विचारपूस केली.


मारकळ यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू....
‘सबकुछ ठिक है ना, कुछ अडचण तो नही..?’ असे जिल्हाधिकाऱ्यांनी विचारताच निर्मला मोरे व त्यांचे पती सतीश मारकळ यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हात जोडून साहेब आपल्या आशीर्वादाने सर्व काही ठिक आहे, असे सांगून त्यांचा सत्कार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com