‘बावलगाव’च्या रंगाची किमयाच न्यारी... होळीसाठी रंग पोहचला नागपूरच्या दारी...  

शिवचरण वावळे
Sunday, 8 March 2020

रोजच्या बघण्यातली अनेक फुले, झाडे, फळे व वनस्पतीबद्दल गावकऱ्यांना फारशे महत्व वाटत नाही. बावलगावात देखील फळे, फुले, झाडे व महत्वाच्या वनस्पती कमी नव्हत्या. मात्र, त्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत होते. प्रा. डॉ. महावीर घंटे यांच्या संशोधनातून अन्न पदार्थापासून आणि वनस्पतीपासून नैसर्गिक रंग तयार करण्यात यश प्राप्त झाले

नांदेड : नैसर्गिक साधन संपतीचा उपयोग करून घेण्याचे ज्ञान नसल्याने झाड, पाला, औषधी वनस्पती सोडल्यास रोजच्या बघण्यातली अनेक फुले, झाडे, फळे व वनस्पतीबद्दल गावकऱ्यांना फारशे महत्व वाटत नाही. बावलगावात देखील फळे, फुले, झाडे व महत्वाच्या वनस्पती कमी नव्हत्या. मात्र, त्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत होते. प्रा. डॉ. महावीर घंटे यांच्या संशोधनातून अन्न पदार्थापासून आणि वनस्पतीपासून नैसर्गिक रंग तयार करण्यात यश प्राप्त झाले अन् बघता बघता बावलगावचा ‘विकास’ झाला. 

ग्रामविकास टीमचे प्रा. डॉ. महावीर घंटे यांनी २०१८ साली संशोधन करून खाण्याचा वस्तूपासून नैसर्गिक रंग तयार करण्याचे संशोधन सुरू केले. त्यात त्यांना यश आले. त्यात मक्याचे पावडर, फळे, भाजीपाला व खाण्याचे रंगापासून नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी प्राध्यान्य दिले. हे रंग आरोग्यास अपाय करत नाहीत. त्याचे प्रत्यक्ष उत्पादन बावलगाव येथे २०१८ साली ग्रामविकास समितीमार्फत सुरू करण्यात आले. यात १५ महिलांना औरंगाबादला प्रशिक्षणासाठी पाठवून त्यांना रोजगार मिळवून दिला. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गावात आल्याने झपाटल्याप्रमाणे नैसर्गिक रंग निर्मितीसाठी काम सुरू केले.  

Image may contain: 4 people, people sitting and child
नांदेड : बावल गावच्या महिला व मुले नैसर्गिक रंगाची निर्मिती करताना.

हेही वाचा - डॉक्टर मला वाचवा ‘कोरोना’ झाला, असे म्हणत २१ वर्षाचा मुलगा...

नागपूरच्या संघ कार्यालयाकडून नैसर्गिक रंगाची दखल
सुरवातीला या महिलांनी तीन हजार नैसर्गिक रंगांची पाकिटे तयार केली होती. हे पाकिट विकायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला, तेंव्हा ग्रामविकासाचे विनय कानडे, दीपक तांबोळी, किसन काका राऊत यांनी १२ जिल्ह्यात जाऊन या रंगाची मार्केंटिंग सुरु केली. त्यानंतर जवळपास २५ गावातील महिलांनी नैसर्गिक रंग उत्पादन सुरू केले. मागील तीन वर्षात रंग आज एक लाख पाकिटे उत्पादन करत आहे. याविषयची वर्तमानपत्रातून छापलेली बातमी नागपूरच्या संघ कार्यालयात पोहचल्याने संघ प्रमुखाने नांदेडच्या नैसर्गिक रंगानेच यंदा होळी साजरी करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा - ‘त्या’ तिघींचा गावापासून - विदेशात नौकरीपर्यंतचा असा घडला प्रवास

दत्तक गावाचा विकास झाला
बिलोली तालुक्यातील बावलगाव पुनर्वसित गावात २०१७ पर्यंत समस्यांचा डोंगर असलेले हे चौदाशे लोकसंख्या असलेले दुर्लक्षित गाव. गावाला जायला साधा रस्ताही नव्हता. बिलोलीवरून सहा किलोमीटरच्या अंतररावर असलेल्या गावाला जाण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा एवढी काटेरी वनस्पती वाढल्या गावात जाण्यासाठी एक तासाचा वेळ लागत असे. गावात सर्व बोअरला क्षारयुक्त पाणी, स्वच्छतागृहाचा अभाव त्यामुळे आजारांचे प्रमाण जास्त असे, हे गाव ग्रामविकासचे उदय संगरेड्डीकर, दिपक मोरताळे, श्री. मठपती व टीमने दत्तक घेतले.

Image may contain: outdoor
नांदेड : विविध नैसर्गिक रंग तयार करुन वाळत घालताना ग्रामस्थ.

गावातील पंधरा ते वीस महिलांना दिले प्रशिक्षण
गावातील महिला व युवकांना औरंगाबाद येथे प्रशिक्षणासाठी पाठवले, झपाटून कामास लागले. गावात नियमित स्वछता, गावाच्या विकासासाठी बैठका घेतल्या. महिलांनी पुढाकार घेतला त्यांना युवकांनी साथ दिली. पाहता पाहता गावाच्या समस्या सुटू लागल्या. सहा किलोमीटरचा रस्ता गावकऱ्यांनी श्रमदानातून दुरुस्त केला, आठ दिवसांत सहा किलोमीटर रस्ता मुरूम टाकून दुरुस्त केला, मुरूमसाठी आर्थिक मदत महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान व नांदेड येथील समाजसेवी व्यक्तींनी उभी केली. याची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेऊन २०१९ मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून गावातील डांबरीकरण रस्ता तयार झाला.

Image may contain: 3 people, people sitting
नांदेड : नैसर्गिक हिरवा रंग तयार करताना बावलगावच्या महिला सदस्या.

 

ग्रामविकास टीमसाठी खूप आनंदाची बाब

पुणे, मुंबई येथेही हे रंग दरवर्षी पाठवण्यात येत आहे. अशीच एक बातमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयात पोहचली, तेथील कार्यलय प्रमुख यांनी त्याची दखल घेत या वर्षी संघ मुख्यालयात ‘बावलगाव’च्या नैसर्गिक रंगानेच होळी साजरी करण्यात येणार आहे. ही खरंच ‘बावलगाव’ व संपूर्ण ग्रामविकास टीमसाठी खूप आनंदाची बाब आहे.

- दिपक मोरताळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Color Of 'Bawalgaon' Is Just Different The Color Of Holi Reaches The Door Of Nagpur Nanded News