उस्मानाबाद : ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेला सुरवात

सुधीर कोरे
मंगळवार, 7 मे 2019

उस्मानाबादेत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेत बैलजोड्यांची गावातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उत्कृष्ट पशूंच्या पालकांना पारितोषिके देण्यात आली.

जेवळी : जेवळी (जि. उस्मानाबाद) येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेला मंगळवारी (ता. 7) पहाटे पाचच्या सुमारास मंदिरातील शिवलिंगाची पंचकलश पूजा, रुद्राभिषेकाने सुरवात झाली. त्यानंतर परिसरातील अनेक बैलजोड्यांची गावातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उत्कृष्ट पशूंच्या पालकांना पारितोषिके देण्यात आली. बैलजोड्यांची मिरवणूक हे या यात्रेचे पहिल्या दिवशीचे आकर्षण असते.

समतेचे पुजारी, वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या महात्मा बसवेश्वरांचे जेवळी येथे पुरातन मंदिर आहे. अनेक वर्षांपासून ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांची जयंती येथे यात्रेच्या स्वरूपात साजरी केली जाते. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रा महोत्सवाची सुरवात मंगळवारी (ता. 7) पहाटे मंदिरातील शिवलिंगाची पंचकलश पूजा, रुद्राभिषेकाने झाली. यानंतर सकाळी आठ वाजता काशीनाथ स्वामी यांच्या घरी बसवेश्वरांच्या पाळण्याचा कार्यक्रम झाला. दहा वाजता परिसरातील पशुपालकांनी आणलेल्या बैलजोड्यांची गावातील मुख्य रस्त्यावरुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी या पशुंना मोठ्या प्रमाणात सजविण्यात आले होते. ही मिरवणूक मंदिर परिसरात गेल्यानंतर जिल्हास्तरीय पशुप्रदर्शन पार पडले. यावेळी उत्कृष्ट पशुंच्या पालकांना गटनिहाय प्रथम, द्वितीय, तृतीय अशी पारितोषिके देण्यात आले आहे. ही पारितोषिके या परिसरात शेतकरी वर्गात मानाची समजली जातात. काही पशुपालक तर यात्रेत पारितोषिक मिळावे म्हणून पशुधन सांभाळत असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The commencement of the pilgrimage to Mahatma Basaveshwar in Osmanabad