शाळा इमारती दुरुस्तीसाठी आयुक्तांना विशेषाधिकार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

औरंगाबाद  - शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना महापालिका प्रशासनाने शाळा इमारतींच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल नगरसेवकांनी सोमवारी (ता. ११) झालेल्या सर्वसाधारण सभेत जाब विचारला. त्यावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी अधिकाऱ्यांनी तातडीने इमारतींची पाहणी करून आयुक्तांनी आपल्या विशेषाधिकारामध्ये कामे करावीत, असे आदेश दिले. 

नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यात महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वपक्षीय नगरसेवकांनी मांडला. त्यानंतर अनेकांनी महापालिका शाळांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. अनेक शाळांमध्ये किरकोळ दुरुस्त्या करणे आवश्‍यक आहे. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या शिक्षकांना अद्याप मानधनवाढ करण्यात आलेली नाही. तुटपुंज्या मानधनावर त्यांचा संसार कसा चालेल? असा सवाल प्रशासनाला करण्यात आला. नारेगाव येथील शाळेची इमारत जीर्ण झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर महापौरांनी अधिकाऱ्यांनी तातडीने शाळांची पाहणी करावी. अत्यावश्‍यक कामे आयुक्तांच्या विशेषाधिकारांमध्ये करण्यात यावीत, असे आदेश दिले.

गुणवंतांचा करणार सत्कार 
महापालिकेच्या शाळांमधून सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना पुढील शिक्षणासाठी हातभार लागावा म्हणून दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन सत्कार केला जातो. यंदा १४ जूनला सत्काराचे नियोजन करावे, असे आदेश महापौरांनी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांना दिले.  

Web Title: Commissioner's privileges to repair the school buildings