दानपेटीतील पैशांतून सामुदायिक विवाह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

औरंगाबाद - जिल्ह्यातील मंदिरांनी एकत्र येत आपल्या दानपेटीतील पैशांतून वेरूळ (ता. खुलताबाद) येथे शनिवारी (ता. १२) सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे. यामध्ये ५१ जोडपी विवाहबद्ध होतील, अशी माहिती धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांनी मंगळवारी (ता. ८) पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद - जिल्ह्यातील मंदिरांनी एकत्र येत आपल्या दानपेटीतील पैशांतून वेरूळ (ता. खुलताबाद) येथे शनिवारी (ता. १२) सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे. यामध्ये ५१ जोडपी विवाहबद्ध होतील, अशी माहिती धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांनी मंगळवारी (ता. ८) पत्रकार परिषदेत दिली.

धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या २५ धार्मिक संस्थांच्या सदस्यांची यासाठी एक समिती तयार करण्यात आली असून, या समितीची नोंदणीही धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात करण्यात आली आहे. या समितीकडे विविध संस्थांनी आपल्या मंदिराच्या दानपेटीतील रक्कम विवाह सोहळ्यासाठी जमा केली आहे. ता. आठ मेअखेरीस समितीच्या खात्यात १३ लाख ५० हजार रुपये रक्कम जमा झाल्याचे समितीचे सचिव दयाराम बसय्ये यांनी सांगितले. वेरूळ येथील जनार्दन स्वामी आश्रमातर्फे या सोहळ्याची तयारी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेदरम्यान मधुकर ढिलपे यांनी या सोहळ्यासाठी आर्थिक मदत केली. यावेळी विवेक सोनुने, एस. के. मुळे, एस. व्ही. एच. कादरी, ए.एस. बडगुजर यांच्यासह समितीचे अध्यक्ष आमदार संदीपान भुमरे, सहसचिव राजू कुलकर्णी, कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण वक्ते, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते. 

वधू-वरांना देणार भेटवस्तू 
वधू-वरांना समितीतर्फे ११ हजार रुपयांचा धनादेश, एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, ५३ प्रकारची भांडी, चांदीची जोडवी, एक स्टील कपाट, एक चौरंग, दोन पाट आदी साहित्य देण्यात येणार आहे. वऱ्हाडी मंडळींच्या भोजनाची व्यवस्था समितीकडे असणार आहे.

धार्मिक कार्यक्रम घरी होणार 
विवाहापूर्वीचे सर्व धार्मिक कार्यक्रम वधू-वरांना आपापल्या घरीच करावे लागणार आहेत. वधू-वरांना १२ मेरोजी सकाळी सात वाजतापर्यंत वेरूळ येथे पोचून साडेसातवाजेपर्यंत लग्नापूर्वीचे विधी करायचे आहेत.

 

Web Title: Community marriage motivation