हुतात्मा काकासाहेबांच्या कुटुंबियांची पाच लाखात बोळवण; तब्बल वर्षभराने मदत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना महापालिकेतर्फे 10 लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर करण्यात आली होती. वर्ष होऊनही मदत मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात होता.

औरंगाबाद : मराठा आरक्षण मागणीसाठी कायगाव टोका येथे गोदावरी नदीत जलसमाधी घेतलेले हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना महापालिकेतर्फे 10 लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर करण्यात आली होती. वर्ष होऊनही मदत मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान मंगळवारी (ता. 27) पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाच लाख रुपयांचा धनादेश काकासाहेब यांच्या आई-वडिलांना सुपूर्द करण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी काकासाहेब शिंदे हुतात्मा झाले. महापालिकेच्या सभेत त्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले; मात्र त्यानंतर प्रशासनाला आणि पदाधिकाऱ्यांना त्याचा विसर पडला. याबाबत नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी नाराजी व्यक्त करीत प्रशासनाला धारेवर धरले होते. दरम्यान महापौरांनी दोन दिवसांमध्ये मदत दिली जाईल असे घोषित केले. मात्र औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही मदत लांबणीवर पडली होती.

आचारसंहिता संपताच मंगळवारी काकासाहेब यांची आई मीराबाई, वडील दत्तात्रेय यांच्याकडे पाच लाख रुपये रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समिती सभापती जयश्री कुलकर्णी, सभागृहनेते विकास जैन, अतिरिक्त आयुक्त डी.पी. कुलकर्णी, मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अॅड. सुवर्णा मोहिते विकीराजे पाटील,  हेमंत देशमुख यांची उपस्थिती होती. 10 लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली होती; मात्र कायदेशीर अडचणीमुळे फक्त पाच लाख रुपयांची मदत दिली जात असल्याचे महापौरांनी नमूद कले.

दिलगिरी व्यक्त करीत दिला धनादेश
महापालिकेतर्फे मदतीचा धनादेश देण्यासाठी तब्बल वर्षभराचा कालावधी लागल्यामुळे महापौरांनी शिंदे कुटुंबीयांकडे दिलगिरी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: compensation to family of martyard Kakasaheb shinde after one year