फिर्यादी कनिष्ठ अभियंता संतोष रेड्डी निलंबित

युवराज धोतरे
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

येथील लोणी एमआयडीसी परिसरात असलेल्या एका व्यापाऱ्याचे रोहित्र अनधिकृतपणे स्थलांतरित करून साखर कारखान्याच्या एक्सप्रेस फिडरवर जोडल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संबंधित कनिष्ठ अभियंत्याने व्यापार्याविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला होता. मात्र तपासामध्ये फिर्यादी कनिष्ठ अभियंता संतोष शंकर रेड्डी रामासाने हा दोषी आढळल्याने बुधवारी (ता 18) अधीक्षक अभियंत्यांनी या कनिष्ठ अभियंत्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

उदगीर(जि. लातूर) : येथील लोणी एमआयडीसी परिसरात असलेल्या एका व्यापाऱ्याचे रोहित्र अनधिकृतपणे स्थलांतरित करून साखर कारखान्याच्या एक्सप्रेस फिडरवर जोडल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संबंधित कनिष्ठ अभियंत्याने व्यापार्याविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला होता. मात्र तपासामध्ये फिर्यादी कनिष्ठ अभियंता संतोष शंकर रेड्डी रामासाने हा दोषी आढळल्याने बुधवारी (ता 18) अधीक्षक अभियंत्यांनी या कनिष्ठ अभियंत्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. 

सोमवारी (ता.16) रोजी लोणी सबस्टेशनचे यंत्रचालक सुधीर प्रभुराव बिरादार व अभिजीत व्यंकटेश लाखणे यांना दोषी धरुन लातूरचे अधीक्षक अभियंता नंदेश माने यांनी निलंबनाची कारवाई केली. तंत्रज्ञ दत्ता शेषराव कांबळे याच्यावर उदगीरचे कार्यकारी अभियंता सुधाकर जाधव यांनी निलंबनाची कारवाई केली होती. आज कनिष्ठ अभियंत्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 महावितरण कंपनीच्या लोणी सब स्टेशन अंतर्गत तोंडार पाटी जवळ अखिल अॅग्रोटेक नावाचा कारखाना आहे. या कारखान्यास विद्युत पुरवठा करणारे रोहित्र हे महावितरणच्या हकनकवाडी फिडरवर होते. अखिल अॅग्रोटेकच्या मालकाने त्याचे रोहित्र हकनकवाडी फिडरवरून स्थलांतरित करून साखर कारखान्याच्या एक्सप्रेस फिडरवर जोडण्यात यावे असा अर्ज महावितरण कंपनीकडे केला होता.

परवानगी किंवा मंजुरी मिळालेली नसतानाही अनधिकृतपणे रोहित्र स्थलांतरित करून साखर कारखान्याच्या एक्सप्रेस फिडरवर जोडल्याचा प्रकार उघडकीस आला. याच्या चौकशीअंती या कर्मचाऱ्यावर व कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई करण्यात आल्याचे लातुरच्या महावितरण सूत्राकडून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complainant Junior Engineer Santosh Reddy suspended