‘ओमेक्‍स ॲग्रो’च्या मालकावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

बुधोडा (ता. औसा) शिवारातील ‘ओमेक्‍स ॲग्रो फर्टिलायझर्स’ या कंपनीतील स्फोटात दोन मजुरांचा मृत्यू झाल्यानंतर कारखान्याचा मालक दिनेश पपरुनीया याच्याविरुद्ध आज औसा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. 

औसा -  बुधोडा (ता. औसा) शिवारातील ‘ओमेक्‍स ॲग्रो फर्टिलायझर्स’ या कंपनीतील स्फोटात दोन मजुरांचा मृत्यू झाल्यानंतर कारखान्याचा मालक दिनेश पपरुनीया याच्याविरुद्ध आज औसा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. 

या कारखान्यत लिंबोळी, करंजपासून पेंड व तेल काढण्याचे काम चालते. त्याशिवाय जुने टायर जाळून त्यापासून तेल काढण्याचाही धंदा सुरू झाला होता. काल सायंकाळी टायर जाळून तेल काढण्याच्या बॉयलरचा स्फोट होऊन सेलू (ता. औसा) येथील मेहताब बाबू मुल्ला आणि मध्यप्रदेशातील उदयराज कोल या मजुरांचा मृत्यू झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा दोन्ही मृतदेह आणण्यात आले होते. आज सकाळी उत्तरीय तपासणीनंतर संबंधितांच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यास घेण्यास नकार दिला. कारखाना मालकाला अटक करून कुटुंबीयाला आर्थिक मदत मिळावी, अशी त्यांची मागणी होती. त्यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला. अखिल भारतीय छावा युवा संघटना, संभाजी सेनेने तहसीलदारांना निवेदने देऊन अशीच मागणी केली. औशाचे पोलिस निरीक्षक नरसिंह ठाकूर यांनी कारखाना मालक दिनेश पपरुनीया याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून अटकेची कारवाई सुरू केल्याचे सांगितल्याने तणाव निवळला.

कुटुंबाचा आधार गेला 
मेहताब मुल्लावर सायंकाळी अंत्यसंस्कार झाले. उदयराजचा मृतदेह त्याच्या मध्यप्रदेशातील गावी पाठविण्यात आला. मेहताबच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात झाला. तो कुटुंबाचा आधार होता. त्याच्या मागे वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन मुली, सहा वर्षांचा मुलगा आहे. दोन मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पन्नास लाखांची मदत मिळावी आणि कारखाना मालकाविरुद्ध कारवाईची मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघठनेचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू कोळी, संभाजी सेनेचे जिल्हाध्यक्ष धर्मराज पवार यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली.

वीज खंडित तरी काम सुरू!
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सांगण्यावरून दोन महिन्यांपूर्वी ‘ओमेक्‍स’चा वीजपुरवठा तोडला होता. तरीही टायर जाळून तेल काढण्याचे काम कसे सुरू होते? महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या ही गोष्ट ध्यानात का आली नाही, आदी प्रश्न उपस्थित होत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: complaint has been registered against Omex agro owner

टॅग्स