नुकसानीचे पंचनामे त्वरीत पूर्ण करा ; पालकमंत्री मलिक यांचे आदेश 

PRB20A03608
PRB20A03608

परभणी ः मागील दोन महिन्यापासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामूळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे पूर्ण करुन लवकरच मदत मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी (ता.२३) दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीस आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉ.राहूल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलिस अधीक्षक जयंत मीना, महापालिका आयुक्त देविदास पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

१०८ कोटी १५ लक्ष रुपये नुकसान भरपाई अपेक्षित 
पालकमंत्री श्री. मलिक म्हणाले, हवामान खात्याने पुन्हा पाऊस होणार असल्याचे संकेत दिले असून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्याच्या दृष्टीने लवकरच निर्णय घेऊन मदत देण्यात येणार आहे. जिल्ह्यात जवळपास दोन लाख १५ हजार ६७५ शेतकरी असून बाधित क्षेत्र एक लाख ५८ हजार ३८६ हेक्टर आहे. या बाधित शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे १०८ कोटी १५ लक्ष रुपये नुकसान भरपाई अपेक्षित असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 

किसान क्रेडीट कार्डची व्याप्ती वाढवावी

जिल्ह्यातील बँकांनी प्रथम येणाऱ्यास प्रथम पीक कर्जाचे वितरण या नियमाप्रमाणे पीककर्ज वाटप करावे. तसेच एखाद्या बँकेकडे गाव दत्तक नसल्यामुळे पीक कर्ज देण्यास टाळाटाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात बँकांनी किसान क्रेडीट कार्डची व्याप्ती वाढवावी, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देवून रब्बीच्या पेरणीबाबत बियाण्यांची गरज व पुरवठा याबाबतची माहिती विचारात घेवून रब्बीला लागणाऱ्या सर्व बियाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना या वेळी पालकमंत्री श्री. मलिक यांनी दिल्या. 

केंद्राकडून राज्य सरकारचा छळवाद ः नवाब मलिक 
परभणी ः आपल्या पक्षाची सत्ता नसल्यानेच केंद्र सरकारने महाराष्ट्राबाबत हेतुतः अडवणुकीचे धोरण अवलंबिले आहे. सध्याच्या आपत्तीच्या काळात केंद्राकडून दुजाभाव होतो आहे. जीएसटीचेही मोठ्या प्रमाणावर पैसे थकवले आहेत. एकंदरीत केंद्राकडून छळवाद सुरू असल्याचा आरोप पालकमंत्री नवाब मलिक यांनी केला. जिल्ह्यातील काही गावांत अतिवृष्टीग्रस्त पिकांची शुक्रवारी (ता. २३) पाहणी केल्यानंतर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्राकडून अडवणुकीचा प्रकार सुरू असला तरी राज्य सरकारने आपद्ग्रस्तांना दिलासा मिळावा यासाठी आजच मोठ्या मदतीची घोषणा केली आहे, असे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यातील एक लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्याप्रमाणे १०८ कोटी १५ लाख रुपये नुकसानभरपाई अपेक्षित आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार मदत दिली जाईल. कोणीही मदतीविना राहणार नाही, याची दक्षता प्रशासनामार्फत घेण्यात येईल, असेही मलिक म्हणाले.

नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडून पाहणी 
परभणी ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पालकमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी (ता.२३) पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी पालकमंत्री नवाब मलिक यांनी ढेंगळी पिंपळगाव येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला व शेतातील पिकांची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे मागणी केली. कोल्हा (ता.मानवत) शिवारात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. विष्णू बाजीराव तारे यांच्या शेतातील कापसाची तर सुरेश शिवाजीराव तारे यांच्या शेतातील तूर, सोयाबीन या पिकांची पाहणी केली. सर्व क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. पीककर्ज वाटपात बॅंका अडवणूक करत असल्याची तक्रार उपस्थित शेतकऱ्यांनी केल्यानंतर पालकमंत्री मलिक यांनी पीककर्जाच्या संथगतीवर नाराजी व्यक्त करत बॅंक व्यवस्थापकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच त्यांनी पाथरी तालुक्यातील गावांनाही भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com