कंपोस्टींग पीट बांधकामाचा चौकशी अहवाल रखडला 

माधव इतबारे
शुक्रवार, 6 जुलै 2018

दीड महिन्यानंतरही कंपोस्टिंग पीट बांधण्याचे कामाच्या चौकशीचा अहवाल समोर आला नाही. मात्र जुन्या शहरात सर्वत्र रस्त्यावर मिक्‍स कचराच येत असल्याने हे पीट कुचकामी ठरले असून, आतापर्यंत झालेला खर्च व्यर्थ झाल्याचे निष्कर्षापर्यंत प्रशासन आले आहे. 

औरंगाबाद - शहरात निघणाऱ्या ओल्या कचऱ्याची कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने 5 कोटी 45 लाख रुपये खर्च करून कंपोस्टिंग पीट बांधण्याचे काम हाती घेतले होते; मात्र या कामावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होताच सर्वसाधारण सभेने चौकशीचे आदेश दिले. दीड महिन्यानंतरही चौकशीचा अहवाल समोर आला नाही. मात्र जुन्या शहरात सर्वत्र रस्त्यावर मिक्‍स कचराच येत असल्याने हे पीट कुचकामी ठरले असून, आतापर्यंत झालेला खर्च व्यर्थ झाल्याचे निष्कर्षापर्यंत प्रशासन आले आहे. 

नारेगाव येथील कचरा डेपोच्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केल्यानंतर शहरातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी खुल्या जागांवर कोट्यवधी रुपये खर्च करून 430 कंपोस्टिंग पीटचे बांधकाम सुरू करण्यात आले. त्यावर 5 कोटी 45 लाख रुपये एवढा खर्च अपेक्षित होता. विशेष म्हणजे या कामांसाठी तत्कालीन प्रभारी आयुक्त नवलकिशोर राम यांनी विशेषाधिकाराचा वापर केला. दरम्यान, महिनाभरापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी इंदूरच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या कंपोस्टिंग पीटचा शहरात वापर होणार आहे का? असा प्रश्‍न करीत चौकशीची मागणी केली होती. महापौरांनीही चौकशीचे आदेश दिले; मात्र अद्यापपर्यंत अहवाल आलेला नाही. दरम्यान, कंपोस्टिंग पीटच्या कंत्राटदाराची बिले तूर्तास न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. प्रभाग एक, दोन व नऊमध्ये गेल्या चार महिन्यात ओला व सुका कचरा नागरिकांकडून वेगवेगळा करून घेण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे हे कंपोस्टींग पीट कुचकामी ठरत आहेत. मिक्‍स कचऱ्याचे केवळ डंपिंग केले जात असल्यामुळे संपात व्यक्त केला जात आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Composting Pit Construction Report is stop