कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी फेकला प्रभाग कार्यालयात कचरा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

औरंगाबाद - संजयनगर वॉर्डात एका मैदानावर पडून असलेला कचरा वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही उचलण्यात येत नसल्याने संतप्त झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात रिक्षा भरून कचरा टाकत सोमवारी (ता. 18) आंदोलन केले. एका नगरसेविकेच्या पतीसह कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरोधात या वेळी जोरदार घोषणाबाजी केली.

औरंगाबाद - संजयनगर वॉर्डात एका मैदानावर पडून असलेला कचरा वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही उचलण्यात येत नसल्याने संतप्त झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात रिक्षा भरून कचरा टाकत सोमवारी (ता. 18) आंदोलन केले. एका नगरसेविकेच्या पतीसह कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरोधात या वेळी जोरदार घोषणाबाजी केली.

कचराकोंडीनंतर महापालिकेने संजयनगर वॉर्डात एका खुल्या जागेवर कचरा साठविण्यास सुरवात केली होती. कचऱ्याला सर्वत्र विरोध होत असताना कॉंग्रेस नगरसेविका मलेका बेगम हबीब कुरेशी यांनी महापालिकेला कचरा डेपोसाठी पर्यायी जागा मिळेपर्यंत खुल्या मैदानावर वॉर्डातील कचरा टाकण्याची सूचना केली होती; मात्र पाहता-पाहता साडेतीन महिने उलटून गेले व कचऱ्याचे ढीग वाढत गेले. वॉर्डाबरोबरच इतर ठिकाणचा कचरादेखील येथे टाकण्यात आला.

दरम्यान, कचऱ्याच्या ढिगातून प्रचंड दुर्गंधी सुटल्याने परिसरातील नागरिकांनी विरोध सुरू केला. त्यामुळे नगरसेविकेने कचरा उचलण्यासंदर्भात वारंवार महापालिका अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. कचऱ्याचा त्रास वाढत गेल्याने काही नागरिकांनी नगरसेविकेच्या घरावर हल्लाबोल केला. त्यानंतरही महापालिकेने कचऱ्याकडे काणाडोळा केला. त्यामुळे सोमवारी सकाळी नगरसेविका कुरेशी यांचे पती हबीब कुरेशी यांच्यासह कार्यकर्त्यांनी जुना मोंढा भागातील प्रभाग कार्यालय क्रमांक दोनसमोर आंदोलन केले. या वेळी रिक्षा भरून कचरा कार्यालयात आणून टाकल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. कार्यकर्त्यांनी काही काळ घोषणाबाजी केली; मात्र कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी नसल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.

जिन्सीच्या मैदानावर दाबला कचरा
महापालिका अधिकाऱ्यांनी जिन्सी येथील मैदानावर खड्डे खोदून मोठ्या प्रमाणात कचरा दाबल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. रात्रीच्या वेळी खड्डे खोदून त्यात कचरा भरून वरून माती टाकण्यात आली आहे, असे नागरिकांनी सांगितले. महापालिकेच्या या प्रकारामुळे जमिनीतील प्रदूषण वाढण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Congree Activists ward office garbage agitation