काँग्रेस-भाजपच्या भवितव्याचा फैसला

अरविंद रेड्डी 
गुरुवार, 20 एप्रिल 2017

लातूर - महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बुधवारी (ता. १९) मतदान झाले. पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसला भाजपने कडवे आव्हान दिले. राष्ट्रवादी व शिवसेना स्पर्धेत दिसून आली नाही. परिणामी काँग्रेसविरुद्ध भाजपचा थेट सामना रंगला. शून्यावरील भाजपला मिळणाऱ्या जागा बोनस असतील, पण सत्तेतील काँग्रेसच्या भवितव्याचा फैसला करणारी ही निवडणूक ठरली आहे.

लातूर - महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बुधवारी (ता. १९) मतदान झाले. पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसला भाजपने कडवे आव्हान दिले. राष्ट्रवादी व शिवसेना स्पर्धेत दिसून आली नाही. परिणामी काँग्रेसविरुद्ध भाजपचा थेट सामना रंगला. शून्यावरील भाजपला मिळणाऱ्या जागा बोनस असतील, पण सत्तेतील काँग्रेसच्या भवितव्याचा फैसला करणारी ही निवडणूक ठरली आहे.

महापालिकेच्या १८ प्रभागांतून ७० सदस्यांच्या निवडीसाठी बुधवारी मतदान झाले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसभरात कडाक्‍याचे ऊन होते. उन्हाचा मतदानावर परिणाम झाल्याने मंदगतीने मतदान झाले. लोकांमध्ये फारसा उत्साह नव्हता; मात्र राजकीय पक्ष व कार्यकर्ते वेगवान हालचाली करताना दिसले. निवडणूक प्रचारात सत्ताधारी व विरोधी पक्षांतील नेत्यांवर आरोपांच्या फैरी झडल्या. त्यातून निलंगा-लातूर अशा संघर्षाचे चित्र निर्माण झाले. प्रचार संपल्यावर प्रभाग दोन, सहा व १८ सह अन्य काही प्रभागांत हाणामारीचे प्रसंग घडले. शांततेचा भंग झाल्याने राजकारण ढवळले. पोलिस दलाने संबंधितांवर कारवाई करीत बळाचा वापर करून कायदा व सुव्यवस्था राखली. मतदानाच्या दिवशी किरकोळ प्रकार वगळता शांतता राहिली; मात्र मतदारांची शांतता राजकीय कार्यकर्त्यांना भयाण वाटू लागली आहे. खऱ्या अर्थाने काँग्रेसविरुद्ध भाजपचा सामना झाला. महापालिकेवर वर्चस्व असलेले आमदार अमित देशमुख यांच्या तगड्या टीमसोबत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या समर्थकांनी झुंज दिली. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपाइंच्या नेत्यांनी सभा, रॅली, रोड शोच्या माध्यमातून प्रचार केला. सुरवातीला धिम्यागतीने चालणारा प्रचार शेवटच्या टप्प्यात गतिमान झाला.  

निवडणूकमय वातावरण होताच सत्ता व पैशांचा अमाप वापर झाला. स्थानिक नेते व कार्यकर्ते फोडणे, मतदारांना आश्‍वासने व आमिष देणे, दारू व पैशांचा वापर करण्यासह सर्व हातखंडे वापरले गेले; मात्र मतदानाच्या शेवटापर्यंत मतदारांनी कोणालाही अंदाज येऊ दिला नाही. परिणामी कोणाही उमेदवाराला ते निवडून येण्याचा आत्मविश्‍वास नव्हता. कार्यकर्तेही संभ्रमात राहिले.  शुक्रवारच्या (ता. २१) मतमोजणीनंतर काँग्रेसची सत्ता कायम राहील की भाजपला सत्तेचा अधिकार मिळेल? सत्तेसाठी राष्ट्रवादी व शिवसेनेचा टेकू घ्यावा लागेल का? असे प्रश्‍न आहेत. भाजपचे पालकमंत्री निलंगेकर व काँग्रेसचे आमदार देशमुख यांच्यासह समर्थकांच्या भवितव्याचा फैसला मतदारांनी घेतला आहे. तूर्त मतमोजणीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

२०१२ चे पक्षीय बलाबल
काँग्रेस ः ४९ 
राष्ट्रवादी ः १३
शिवसेना ः ०६
रिपाइं ः ०२

Web Title: Congress-BJP's future