कॉंग्रेस उमेदवाराकडून 69 हजार रुपये जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

अंबाजोगाई - शहरातील प्रभाग तीनमध्ये मतदारांना पैशाचे आमिष दाखविल्याच्या आरोपावरून येथील कॉंग्रेस उमेदवारावर गुन्हा दाखल झाला असून, या उमेदवाराकडून 69 हजार पाचशे रुपये जप्त करण्यात आले. हे प्रकरण विरोधकांचेच षड्‌यंत्र असल्याचा दावा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केला आहे.

शहरातील प्रभाग तीनमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार गणेश मसने मतदारांना पैशाचे आमिष दाखवत असल्याची तक्रार विरोधी उमेदवारांनी केली होती. त्यानुसार निवडणूक विभागाच्या पथकाने प्रभागात जाऊन सदर उमेदवाराची झडती घेतली असता, त्यांच्याकडे 69 हजार पाचशे रुपये आढळून आले. त्यांच्याजवळ मिळालेल्या यादीवरच्या नावांसमोर आकडे लिहिलेले असल्याने संशय वाढला. त्यामुळे ते पैशाचे आमिष दाखवीत असल्याच्या संशयावरून पथक प्रमुख दत्ता गिरी यांनी उमेदवार मसने यांच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

दरम्यान, विरोधी उमेदवारानेच माझ्या खिशात पैसे टाकले, असा दावा उमेदवार गणेश मसने यांनी केला आहे. माझ्यावर केलेले आरोपही खोटे असल्याचे त्यांनी सांगितले.

हे विरोधकांचे षड्‌यंत्र - मोदींचा आरोप
विरोधक निवडणूक सुरू झाल्यापासूनच आम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील आठवड्यात आमची बॅंक व पतसंस्थेतून कर्जपुरवठा होत असल्याच्या तक्रारी विरोधकांनी केल्या होत्या. त्याची पडताळणी निवडणूक आयोगाच्या पथकाने केली. मात्र, त्यात काहीही तथ्य आढळले नाही. त्यामुळे हे विरोधकांचे षड्‌यंत्र असल्याचा आरोप कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केला आहे.

Web Title: congress candidate caught while distributing cash