काँग्रेसचा उमेदवारांसाठी मॉन्सून धमाका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

देशावर ७० वर्षे सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेसची अवस्था एवढी दयनीय झाली आहे, की इच्छुकांना आवाहन करण्याची वेळ आली आहे.

औरंगाबाद -  देशावर ७० वर्षे सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेसची अवस्था एवढी दयनीय झाली आहे, की इच्छुकांना आवाहन करण्याची वेळ आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना-भाजप आणि वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारीसाठी रांगा लागल्या असताना काँग्रेसने मात्र उमेदवारांना निवडणूक लढण्याची इच्छा असेल तर या अन्‌ अर्ज घेऊन जा, असे आवाहन केले आहे.  

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांच्यावर डिपॉझिट गमाविण्याची नामुष्की ओढवली. काँग्रेस उमेदवाराची अशी अवस्था जिल्ह्यात पहिल्यांदाच झाली. त्याचा परिणाम आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढण्यास फारसे कुणी इच्छुक नसल्याचे चित्र आहे. मुंबईत झालेल्या प्रदेश काँग्रेस कमिटीत औरंगाबादेत झालेल्या पराभवाचे चिंतन केल्यानंतर पक्षविरोधात काम करणाऱ्यांची गच्छंती करण्याचा इशारा देण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र तसे काही घडले नाही. लोकसभेला सहाही विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसला मिळालेली मते पाहता काँग्रेसचा उमेदवार निवडून येणे कठीण दिसते. विधानसभा निवडणूक म्हटले, की दहा ते पंधरा इच्छुक उभे राहतात. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षात हे चित्र आतापर्यंत पाहायला मिळाले; परंतु लोकसभेतील पराभवानंतर काँग्रेस पक्षाला ओहोटी लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसवर जिल्ह्यात उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांनी अर्ज घेऊन जावेत, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीने केले आहे. शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांसाठीचे अर्ज शहराध्यक्ष नामदेव पवार, तर ग्रामीण भागातील तीन विधानसभा मतदारसंघांतील अर्ज प्रभारी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल पटेल यांच्याकडे उपलब्ध असणार आहेत.

लोकसभेला केवळ ९१ हजार मते
लोकसभा निवडणुकीत झालेल्या साडेअकरा लाख मतांपैकी काँग्रेसच्या वाट्याला केवळ ९१ हजार मते आली. झाबंड यांना कन्नड-११,२८५, गंगापूर- १२,७८१, वैजापूर- २३,८७०, औरंगाबाद मध्य- १४,१५५, पश्‍चिम- १५,५९५, तर पूर्व विधानसभा मतदारसंघात १४,०९६ एवढी मते मिळाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress has appealed to candidates to contest the elections