बालेकिल्ला ढासळला, कॉंग्रेसचा कापसे गट शिवसेनेत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

कळंब - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच येथील कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शिवाजी कापसे यांच्यासह विद्यमान सहा नगरसेवक आणि बाजार समितीच्या एका संचालकाने बुधवारी (ता. चार) शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईमध्ये "मातोश्री'वर हा प्रवेशाचा सोहळा झाला असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सर्वांचे शिवसेनेते स्वागत केले. 

कळंब - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच येथील कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शिवाजी कापसे यांच्यासह विद्यमान सहा नगरसेवक आणि बाजार समितीच्या एका संचालकाने बुधवारी (ता. चार) शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईमध्ये "मातोश्री'वर हा प्रवेशाचा सोहळा झाला असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सर्वांचे शिवसेनेते स्वागत केले. 

पालिका निवडणुकीत कॉंग्रेसच्या नेतृत्वाने सहकार्य केले नसल्यामुळे येथील कॉंग्रेसचा कापसे गट शिवसेनेत प्रवेश करणार, अशी चर्चा सुरू होती. बुधवारी "मातोश्री'वर कापसे गटाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा विचार करता कॉंग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे बालेकिल्ला टिकविण्याचे खडतर आव्हान कॉंग्रेसच्या नेतृत्वावर येऊन पडले आहे. पालिकेच्या सत्तेपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसने कॉंग्रेसला रोखल्याने व सत्ता गेल्याने कॉंग्रेसच्या कापसे गटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती. कापसे गटाचा शिवसेनेत प्रवेश घेऊन माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी फिल्डींग लावल्याची चर्चा आहे. तालुक्‍याच्या राजकीय मर्यादेत शिवसेनेत आता पाच गट निर्माण झाले आहेत. कापसे यांच्या प्रवेशाच्या वेळी "मातोश्री'वर आमदार प्रा. तानाजी सांवत, माजी आमदार राजेनिंबाळकर, बार्शीचे माजी आमदार राजाभाऊ राऊत, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, जिल्हा सहसंपर्कप्रमुक अनिल खोचरे, अजित पिंगळे आदी उपस्थित होते. 

कॉंग्रेस, शिवसेनेला फटका बसण्याची चिन्हे ः 
दरम्यान, श्री. कापसे यांचा शिवसेनेत प्रवेश निश्‍चित झाल्यानंतर शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष व शहरप्रमुख पांडुरंग कुंभार यांनी राजीनामा दिला आहे. कापसे यांच्या या प्रवेशामुळे निष्ठावंत शिवसेना कार्यकर्त्यांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील मोठा गट शिवसेना सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेससह शिवसेनेला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. 

पाच गटांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम 
शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अजित पिंगळे, माजी आमदार राजेनिंबाळकर, आमदार प्रा. तानाजी सावंत, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, शिवाजी कापसे असे गट पाच गट निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांची कोणाला नेता मानावे, अशी अवस्था झाली आहे. 

यांनी घेतला प्रवेश 
नगरसेवक शिवाजी कापसे, प्रताप मोरे, मुस्ताक कुरेशी, भागवत चोंदे, अनंत वाघमारे, सुरेश शिंदे, बाजार समितीचे संचालक धनंजय फाटक यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Web Title: Congress Kapase group enters Shiv Sena