काँग्रेसमधल्या गळतीने अमित देशमुख हवालदिल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

लातूर : जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसला लागलेल्या गळतीने आमदार अमित देशमुख हवालदिल झाले आहेत. ज्यांना पक्षाने भरभरून दिले ते आज पक्ष सोडून का जात आहेत? जे जातायेत त्यांना माझ्या शुभेच्छा पण जे पक्षाला सोडत आहेत त्यापैकी एकही जण पुन्हा महापालिकेत दिसणार नाही असा इशारा देखील अमित देशमुख यांनी भाजपच्या वाटेवर असलेल्या स्वकीयांना दिला आहे. 

लातूर जिल्ह्यातल्या नगरपालिकांपाठोपाठ जिल्हा परिषदेतही काँग्रेसचा दारुण पराभव झाला. भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीला सुरुंग लावत बहुमतासह सत्ता मिळवली. एप्रिलमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत देखील भाजपची सरशी होण्याची शक्‍यता गृहीत धरून काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी, विद्यमान नगरसेवक सुरेश पाटील यांनी देखील नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला.

मोठ्या प्रमाणावर पक्षाला गळती लागल्यामुळे अमित देशमुख उद्विग्न झाले आहेत. मनातील ही खदखद त्यांनी महापालिकेच्या एका कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केली. भाजप हा उसने अवसान आणणारा पक्ष आहे, त्यामुळे जे लोक काँग्रेस सोडून तिकडे जात आहेत, ते पुन्हा महापालिकेत दिसणार नाहीत, त्यांनी पुन्हा निवडून येऊनच दाखवावे असे आव्हान देतानाच जे पक्षाशी व नेत्यांशी एकनिष्ठ राहतील ते पुन्हा निवडून येतील असा दावा केला आहे. काँग्रेसने शहरात भरपूर विकासकामे केल्याचेही अमित देशमुख म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या पक्षांतराला आपण जास्त गांभीर्य देत नाही असे म्हणत त्यांनी पक्षाला लागलेली गळती रोखण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Congress Latur Amit Deshmukh municipal corporation election