कॉंग्रेसच्या निष्ठावंतांची पावले भाजपच्या वाटेवर! 

अरविंद रेड्डी - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 3 मार्च 2017

लातूर - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा सफाया झाल्यानंतर महापालिकेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह काही नगरसेवकांनी भाजपात जाण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. माजी महापौर अख्तर शेख यांनी भाजपत प्रवेश केल्यापासून आणखी काही नगरसेवक भाजपत जाणार असल्याची चर्चा होती. माजी उपमहापौर सुरेश पवार यांनी गुरुवारी (ता. 2) पालिकेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश निश्‍चित आहे. त्यांच्यासमवेत कॉंग्रेसचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर असल्याने कॉंग्रेसचे नेतृत्व चिंतेत आहे. 

सध्या जिल्हाभरात भाजपमय वातावरण असून, महापालिका निवडणुकीतही भाजपला संधी मिळण्याची आशा आहे. परिणामी कॉंग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांत अस्वस्थता असून, अनेकजण भाजपच्या संपर्कात आहेत. येत्या काही दिवसांत काही नगरसेवक भाजपत प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत. त्यापैकी गेली 25 वर्षे नगरसेवकपदी राहिलेले कॉंग्रेसचे माजी उपमहापौर सुरेश पवार यांनी नगरसेवकपदाचा जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा सादर केला. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तो विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. श्री. पवार यांनी राजीनामा देऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या भेटीसाठी औरंगाबाद गाठले. माजी महापौर अख्तर शेख व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी त्यांचे सारथ्य करीत आहेत. 

कॉंग्रेसला आऊटगोईंग थांबवावे लागणार 
कॉंग्रेसचे आणखी काही नगरसेवक व नगरसेविका राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. त्यापैकी एका नगरसेविकेने गुरुवारी आमदार अमित देशमुख यांना भेटून कॉंग्रेसकडून निवडणूक लढविण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. कॉंग्रेसचे नेते नगरसेवकांनी भाजपत जाऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहेत. मात्र, कॉंग्रेसमधून भाजपात जाणाऱ्या नगरसेवकांची संख्या वाढण्याचे संकेत असून, कॉंग्रेस नेतृत्वाला आऊटगोईंग थांबविण्याचे प्रयत्न करावे लागत आहेत. 

आधी भोपळा फुटला पाहिजे 
महापालिकेची एप्रिलमध्ये निवडणूक होत आहे. पालिकेच्या 70 जागांसाठी 18 प्रभागांतील मतदारयाद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक वॉर्डातून इच्छुक कार्यकर्त्यांकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे. पालिकेच्या विद्यमान सभागृहात भाजपचा एकही सदस्य नसताना भाजपच सत्तेत येईल, असा दावा केला जात आहे. भाजपकडे राजकीयदृष्ट्या सक्षम उमेदवार नसल्याने कॉंग्रेसमधील नेत्यांना निवडणुकीत उतरवून सत्तेत येण्याचे भाजपचे मनसुबे आहेत; मात्र त्यासाठी भाजपचा सभागृहात भोपळा फुटला पाहिजे, असा सूर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी लावला आहे. 

Web Title: congress leader steps on the way to the bjp party