काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे एक पाऊल पुढे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी आघाडीची शक्‍यता 

उदगीर - उदगीर विधानसभा मतदारसंघातील दहा गट व वीस गणांच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्यासाठी नरमाईची भूमिका घेतली असून भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणुका लढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

 आघाडीसंदर्भातील पहिली बैठक लातूरला आशियानावर झाली असून त्यात प्राथमिक चर्चा करण्यात आली.

भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी आघाडीची शक्‍यता 

उदगीर - उदगीर विधानसभा मतदारसंघातील दहा गट व वीस गणांच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्यासाठी नरमाईची भूमिका घेतली असून भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणुका लढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

 आघाडीसंदर्भातील पहिली बैठक लातूरला आशियानावर झाली असून त्यात प्राथमिक चर्चा करण्यात आली.

२०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत तालुक्‍यातील सहा गटांपैकी जिल्हा परिषदेचे पाच गट काँग्रेसच्या ताब्यात तर जळकोट तालुक्‍यातील तीनपैकी एक गट, असे एकूण सहा गटांत काँग्रेस विजयी झाले होते. राष्ट्रवादीने जळकोट तालुक्‍यातील तीन पैकी दोन गटांत विजय मिळवला होता. दोन्ही तालुक्‍यांचे मिळून नऊ गट आहेत. मात्र यावर्षी उदगीर तालुक्‍यात एका जिल्हा परिषद गटाची वाढ होऊन ती सात झाली आहे.

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होण्याच्या संदर्भात माजी राज्यमंत्री दिलीपराव देशमुख यांच्या आशियाना निवासस्थानी सोमवारी (ता.१६) बैठक झाली. यात या निवडणुकीत आघाडी करण्यावर शिक्कामोर्तब झाले असून आता जागा वाटपाची बोलणीला सुरवात होणार आहे. निलंगा व उदगीर, जळकोट, देवणी येथील नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये भाजपाचा चालत असलेला विजयी रथ रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.उदगीर तालुक्‍यातील सात गट व जळकोट तालुक्‍यातील तीन गट, अशा दहा गट व वीस गणांसाठी समसमान जागावाटप व्हावे, यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील राहणार आहे. २०१२च्या निवडणुकीत काँग्रेसला जास्त जागा असल्याने अधिक जागांची मागणी काँग्रेसच्या वतीने केली जाऊ शकते. मात्र जागा वाटपावरून आघाडीला तडा बसण्याची शक्‍यता फारच कमी असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आघाडी करून लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपराव देशमुख यांच्यासोबत राष्ट्रवादीची बैठक झाली असून त्यात आघाडी करून निवडणुका लढवण्याचे ठरले. आता जागा वाटपाची चर्चा होणार असून जागा कमी मिळाल्या तरीही आम्ही आघाडी करूनच निवडणुका लढवू. उदगीर व जळकोट तालुक्‍यातही आम्ही एकत्र लढणार आहोत.
- बसवराज पाटील नागराळकर, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस.

उदगीर व जळकोट तालुक्‍यांत जातीयवादी पक्षाला दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम्ही आघाडी करणार आहोत. सोमवारी लातूरला बैठक झाल्याचे मी वर्तमानपत्रातून वाचले आहे. तेथे झालेल्या निर्णयानुसार आम्ही आघाडी करून लढणार आहोत. उदगीर व जळकोट तालुक्‍यांत एक दोन जागा कमी जास्त झाल्या तरीही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून लढणार आहोत.
 - चंद्रशेखर भोसले, माजी आमदार (काँग्रेस) उदगीर.

Web Title: congress-ncp aghadi