कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी!

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी!
इच्छुकांच्या गर्दीमुळे नेत्यांची होणार दमछाक
  • दोन्ही पक्षांत आघाडीसाठी होणार तालुकास्तरावर चर्चा
  • कॉंग्रेसकडे जिल्हा परिषदेसाठी 650 तर पंचायत समितीसाठी 1100 इच्छुकांचे अर्ज
  • राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे जिल्हा परिषदेसाठी 360 तर पंचायत समितीसाठी 900 इच्छुक

औरंगाबाद - नगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकमेकांच्या विरुद्ध दंड थोपटल्याने दोन्ही पक्षांना जोरदार फटका बसला. आता औरंगाबाद जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत या दोन्ही पक्षांत जिल्ह्यातील 62 गटांत आघाडी होण्याची शक्‍यता कमीच आहे. तालुकास्तरावर दोन्ही पक्षांत एकमत झाले तर आघाडी नाही तर एकमेकांच्या विरुद्ध लढण्याची तयारी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. याला कारणही तसेच असून दोन्ही पक्षांकडे इच्छुक उमेदवारांच्या उड्या पडल्या आहेत. कॉंग्रेस पक्षाकडे 62 गटांसाठी 650 तर पंचायत समित्यांच्या 124 गणांसाठी 1100 इच्छुकांनी अर्ज केले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 62 गटांसाठी 360 तर पंचायत समित्यांसाठी 900 इच्छुकांनी अर्ज केले आहेत. इच्छुकांची गर्दी पाहता सर्वच तालुक्‍यांतील आघाडीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

तयारीसाठी तालुकास्तवर मेळावे
दोन्ही कॉंग्रेस नगरपालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे लढल्याने दोघांना मोठा फटका सहन करावा लागला. आता जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडी व्हावी, यासाठी तालुकास्तरावर काही नेते प्रयत्नशील आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेसाठी 62 गट तर 9 पंचायत समित्यांसाठी 124 गण आहेत. गट आणि गणांसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी अगोदरच इच्छुकांकडून अर्ज मागवून घेतले आहेत. दोन्ही पक्षांना आचारसंहितेची प्रतीक्षा आहे. त्यानंतर मुलाखतीस सुरवात होईल. इच्छुकांचे अर्ज मागविल्यानंतर दोन्ही पक्षांनी तालुकास्तरावर तयारीसाठी मेळावे घेतले. यात आघाडी होणार का? यावर स्पष्टपणे कुणीही बोलले नाही. त्यामुळे आघाडीवर अद्यापही प्रश्‍नचिन्ह आहे.

मतविभाजनाचा फटका बसणार
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मतदार समविचारी आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले तर दोन्ही पक्षांना मतविभाजनाचा फटका सहन करावा लागण्याची शक्‍यता आहे. सध्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस-मनसे या तीन पक्षांची जिल्हा परिषदेत सत्ता आहे. मोठ्या प्रमाणात मत विभाजन झाले तर सत्तासुद्धा गमवावी लागण्याची भीती आहे.

तालुकास्तवर होणार निर्णय
जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यांत 62 गट आहेत. काही तालुक्‍यांत दोन्ही पक्षांच्या तालुकाध्यक्षांमध्ये, नेत्यांमध्ये वाटाघाटी यशस्वी झाल्या तर आघाडी होण्याची शक्‍यता आहे; मात्र दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने जास्तीत जास्त जागा आम्हालाच मिळाव्यात यासाठी दोन्ही पक्ष आग्रही राहणार आहेत. त्यामुळे तालुकास्तरावरसुद्धा आघाडीसाठी मोठा संघर्ष होण्याची शक्‍यता आहे. यामधून मार्ग काढत काही तालुक्‍यांत आघाडीसाठी नेते प्रयत्नशील आहेत.

62 गटांत दोन्ही पक्षांची तयारी
जिल्हा परिषदेच्या 62 आणि पंचायत समित्यांच्या 124 गणांत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी होणार नाही, असे गृहीत धरीत तयारीला सुरवात केली आहे. दोन्ही पक्षांकडे सर्वच गट आणि गणांतील इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आज जरी निवडणुका लागल्या तरी आमची तयारी असल्याचे दोन्ही पक्षांतील नेते सांगत आहेत.

एमआयएम, संभाजी ब्रिगेडचा फटका
ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिम आणि संभाजी ब्रिगेडने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांचा सर्वाधिक फटका कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसण्याची शक्‍यता आहे. एका गटात 22 हजारांच्या जवळपास मतदार असल्याने मतविभाजन होऊन फटका बसला, तर दोन्ही कॉंग्रेसच्या जागा कमी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

आघाडीसाठीचा निर्णय स्थानिक पातळीवर होईल. आम्ही तालुकास्तरावर मेळावे घेऊन तयारी सुरू केली आहे. पूर्ण जिल्ह्याऐवजी आघाडीसाठी तालुकास्तरावरच चर्चा होईल. एखाद्या तालुक्‍यात विषय गुंतागुंतीचा असेल, तर वरिष्ठ पातळीवर सोडविली जाईल. सध्या आमच्याकडे इच्छुकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
- नामदेव पवार (कॉंग्रेस, शहर तथा जिल्हाध्यक्ष)

कॉंग्रेससोबत आघाडीसाठी दोन्ही पक्षांचे तालुकाअध्यक्ष चर्चा करतील. सकारात्मक चर्चा झाली तर तेथे आघाडी होईल; नसता आम्ही कोणतेही बंधन घालणार नाही. आमच्या पक्षाची सर्वच गट, गणांत तयारी आहे. इच्छुकांचे आमच्याकडे मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत.
- आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com