अणदूर गटात काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

शिवसेना, भाजपचा तिढा कायम

अणदूर - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने अणदूर गटातील आपापले उमेदवार जाहीर केले आहेत; परंतु शिवसेना आणि भाजपचा उमेदवार निवडीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अणदूर व चिवरी गणात मात्र फारशी चुरस नसल्याचे दिसत आहे.

शिवसेना, भाजपचा तिढा कायम

अणदूर - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने अणदूर गटातील आपापले उमेदवार जाहीर केले आहेत; परंतु शिवसेना आणि भाजपचा उमेदवार निवडीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अणदूर व चिवरी गणात मात्र फारशी चुरस नसल्याचे दिसत आहे.

अणदूर जिल्हा परिषद गट हा खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाला आहे. त्यासाठी काँग्रेसने आमदार मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र बाबूराव चव्हाण यांना उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच दुसऱ्या पिढीला उतरविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ॲड. दीपक आलुरे यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचा सोशल मीडियावर सध्या धडाक्‍यात प्रचार सुरू आहे. पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे व ॲड. पंडित घुगे यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असून दोघांनीही भाजप पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागितली आहे. शिवसेनेकडून बाळकृष्ण घोडके व संजय भोसले यांची नावे चर्चेत आहेत.
 

गणापेक्षा गटातच चुरस
अणदूर  जिल्हा परिषद गटात अणदूर आणि चिवरी पंचायत समितीचे दोन गण आहेत. अणदूर खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी, तर चिवरी गण इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. अणदूर गणातून काँग्रेसकडून वैशाली मुळे यांचे नाव जाहीर झाले आहे. भाजपकडून लता घोडके, अंजली नरे यांच्यापैकी एकीला उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेकडून छायाबाई घुगे यांना उमेदवारी मिळू शकते, तर राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केला नाही. चिवरी गणातून काँग्रेसकडून रेखा कोरे यांचे नाव निश्‍चित झाले असून भाजपकडून बेबी राठोड यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेकडून तुळसाबाई घोडके यांचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार अद्याप निश्‍चित झाला नाही. त्यामुळे गणापेक्षा गटाच्याच उमेदवारीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

आरक्षणानंतरच वाढली समाजसेवा
गट, गणांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावपातळीवरील विविध कार्यक्रमांत सहभाग घेत नागरिकांना आकर्षित करणाऱ्या योजना सांगून त्यांना आपणच चांगली विकासकामे करू शकतो, असा दावा इच्छुक उमेदवारांकडून केला जात आहे. व्हॉट्‌सॲप, फेसबुक, हाईक, ट्‌विटरवरून संवाद साधून युवकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. एखाद्याचा वाढदिवस, शुभकार्य, लग्नकार्य व अंत्ययात्राही प्रचारातून सुटत नसल्याचे चित्र आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला
अणदूर गट हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून आतापर्यंत एकदाही अन्य पक्षाच्या उमेदवाराला मतदारांनी स्वीकारले नाही; परंतु मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार मधुकरराव चव्हाणांच्या पुत्रप्रेमावर जाहीर टीका करीत माजी सभापती ॲड. दीपक आलुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच झालेल्या अणदूर ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. 

रहस्यमय बिनविरोध निवड
जिल्हा परिषदेच्या मागील निवडणुकीवेळी हा गट इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित होता. काँग्रेसच्या पार्वती घोडके या बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्या वेळी काही पक्षांना उमेदवार मिळाले नाहीत, तर काही उमेदवारांनी ऐनवेळी दगाबाजी करीत माघार घेऊन ‘अर्थ’पूर्ण तडजोडी केल्याची त्या वेळी राजकीय वर्तुळात चर्चा होती. पंचायत समितीच्या अणदूर गणात काँग्रेसचे उमेदवार विक्रम आलुरे यांचा भाजपचे साहेबराव घुगे यांनी पराभव केला होता. चिवरी गणातून मनीषा पाटील विजयी झाल्या होत्या. एकूणच अणदूर गटातील लढतीलाच अधिक महत्त्व प्राप्त झाल्याने त्याअंतर्गत असलेल्या गणांची चर्चा झाकोळून गेली आहे.

Web Title: congress ncp candidate declare for zilla parishad & panchyat committee