औरंगाबादेत काँग्रेसचे दोन नगराध्यक्ष 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

जिल्हात चारपैकी शिवसेनेला एकही ठिकाणी विजय मिळवता आलं नाही तर पैठण आणि गंगापूर मध्ये स्वतः मुख्यमंत्री यांनी सभा  घेतल्या होत्या. वैजापुर नगरपालीकेच्या निवडणुकीचा विषय न्यायालयात गेल्याने येथे निवडणुका होऊ शकल्या नाहीत.

औरंगाबाद - जिल्ह्यातील चार नगरपालिका निवडणुकींचा अंतिम निकाल हाती आला असून काँग्रेसला दोन नगराध्यक्षपद मिळाली आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर, खुलताबाद, पैठण आणि कन्नड नगरपालिकांसाठी रविवारी (ता. 18) मतदान झाले. गंगापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शिवसेना- भाजपा युतीच्या वंदना पाटील विजयी झाल्या आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे 8, कॉंग्रेसचे 7 नगरसेवक निवडून आले असून भारतीय जनता पक्षाला 2 जागांवरच समाधान मानावे लागले. भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांचा हा मतदार संघ आहे. विशेष म्हणजे याच मतदार संघातील खुलताबाद नगरपालिकेत कॉंग्रेसचे एस. एम. कमर हे नगराध्यपदी निवडून आले आहेत. खुलताबादेत कॉंग्रेसला 8, भाजपाला 4, शिवसेनेला 3 तर राष्ट्रवादीला 2 जागांवर विजय मिळाला आहे. खुलताबाद नगरपालिका कॉंग्रेसच्या ताब्यात गेली असून गंगापूर नगरपालिका युतीच्या ताब्यात ठेवण्यात सत्ताधाऱ्यांना थोडक्‍यात यश आले.

कन्नड नगरपालिकेत कॉंग्रेसच्या स्वाती कोल्हे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. त्यासोबतच कॉंग्रेसचे 9 नगरसेवक निवडून आले आहेत. या शिवाय रायबान आघाडीचे 4 आणि शिवसेनेचे 3 नगरसेवक तर 1 अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे. शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांचा मतदार संघ असलेला कन्नडची नगरपालिका कॉंग्रेसच्या ताब्यात गेली आहे. पैठण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे सुरेश लोळगे आघाडीवर आहेत. तर नगरसेवक पदाच्या शर्यतीत शिवसेनेला 7 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय राष्ट्रवादी 6, कॉंग्रेस 4 भारतीय जनता पक्ष 3 आणि 1 अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे.

जिल्हात चारपैकी शिवसेनेला एकही ठिकाणी विजय मिळवता आलं नाही तर पैठण आणि गंगापूर मध्ये स्वतः मुख्यमंत्री यांनी सभा  घेतल्या होत्या. वैजापुर नगरपालीकेच्या निवडणुकीचा विषय न्यायालयात गेल्याने येथे निवडणुका होऊ शकल्या नाहीत.

Web Title: congress wins in aurangabad district municipal council election