रोशनगेटजवळ बुरूज फोडून बांधकाम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

औरंगाबाद - मुघलकालीन तटबंदीचा एक मुख्य दरवाजा असलेल्या रोशनगेटजवळील भलामोठा बुरूज फोडून एकाने बांधकाम सुरू केल्याचे समोर आले आहे. किराडपुरा रस्त्यावरील उद्‌ध्वस्त तटबंदीचा एकमेव बुरूजही भुईसपाट होत असताना महापालिका अधिकारी झोपेत आहेत काय, असा संतप्त सवाल इतिहासप्रेमी करत आहेत.

औरंगाबाद - मुघलकालीन तटबंदीचा एक मुख्य दरवाजा असलेल्या रोशनगेटजवळील भलामोठा बुरूज फोडून एकाने बांधकाम सुरू केल्याचे समोर आले आहे. किराडपुरा रस्त्यावरील उद्‌ध्वस्त तटबंदीचा एकमेव बुरूजही भुईसपाट होत असताना महापालिका अधिकारी झोपेत आहेत काय, असा संतप्त सवाल इतिहासप्रेमी करत आहेत.

मुघल बादशहा औरंगजेबाच्या आदेशाने वर्ष १६६३ मध्ये शहराला घातलेल्या तटबंदीच्या भक्कम बुरुजांनी एकेकाळी या शहराचे संरक्षण केले. आता त्याच बुरुजांना संरक्षणाची गरज असताना महापालिका  अधिकाऱ्यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे हे अवशेष धडाधड पाडले जात आहेत. अर्थात, ऐतिहासिक वास्तूंची तोडफोड करून विकासकामे करण्याचा पायंडा खुद्द महापालिकेनेच घालून दिल्यामुळे अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे करणाऱ्यांचे धाडस चांगलेच वाढत चालले आहे. दमडी महल, खासगेटची वाट लावली जाऊ शकते, तर किरकोळ तटाबुरुजांचा काय पाड? त्यामुळे महापालिका काही कारवाई करील, याची अपेक्षाच नसल्याचे हताश उद्गार अनेकांनी काढले.  

पुरातत्त्व विभागाकडे तक्रार
रोशनगेटकडून किराडपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेला भक्कम चिरेबंदी बुरूज चक्क अर्धा फोडून त्यात इमारतीच्या पायाचे पिलर उभे करणे सुरू आहे. इतके उघडपणे हे सुरू असताना कसलीही हाक झाली ना बोंब! परंतु परिसरातील काहींनी याबद्दल शनिवारी (ता. १५) राज्य पुरातत्त्व विभागाकडे लेखी निवेदन देत तक्रार दाखल केली; मात्र या तटबुरुजांची मालकी महापालिकेकडे असल्यामुळे तक्रारदारांना महापालिकेशी संपर्क करण्यास सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

बुरुजात प्लॉट कसा?
शहरात अनेक भागांत तट-बुरूज पोखरून घरे बांधली गेली आहेत. काहींनी तर या जागेचे पीआर कार्डही स्वतःच्या नावे करून घेतले आहे. अर्थात हे सगळे कशा पद्धतीने झाले असेल, ते वेगळे सांगायला नको. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेतील डोळे मिटून दूध पिणाऱ्या अधिकाऱ्यांनी याकडे अर्थपूर्ण काणाडोळा केल्यामुळेच हे प्रकार घडत असल्याचा आरोप इतिहासप्रेमींनी केला आहे. आताही जागामालकाचा प्लॉट अधिकृत दाखवला असेल, तर अर्ध्या बुरुजावर मालकी कोणत्या पद्धतीने दाखवली, असा सवाल होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: construction near roshangate