महावितरणला ग्राहक मंचाचा दणका 

सुषेन जाधव 
रविवार, 8 जुलै 2018

अर्जदार माजी सैनिक शंकेश्‍वर पोटे यांच्याकडून शेती पंपासाठी दोन वर्षापूर्वी अनामत रक्कम घेऊनही शेती पंपासाठी विद्यूत जोडणी न दिल्याने महावितरणने आठ दिवसाच्या आत अर्जदारास विद्युत जोडणी द्यावी. तसेच एक ऑगस्ट 2016 पासून विद्यूत जोडणी देईपर्यंत दररोज 200 रुपयांप्रमाणे नुकसान भरपाई एक महिन्याच्या आत द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्ष स्मिता बी. कुलकर्णी आणि सदस्य संध्या बादलिंगे व किरण आर. ठोले यांनी दिला आहे. 

औरंगाबाद - अर्जदार माजी सैनिक शंकेश्‍वर पोटे यांच्याकडून शेती पंपासाठी दोन वर्षापूर्वी अनामत रक्कम घेऊनही शेती पंपासाठी विद्यूत जोडणी न दिल्याने महावितरणने आठ दिवसाच्या आत अर्जदारास विद्युत जोडणी द्यावी. तसेच एक ऑगस्ट 2016 पासून विद्युत जोडणी देईपर्यंत दररोज 200 रुपयांप्रमाणे नुकसान भरपाई एक महिन्याच्या आत द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्ष स्मिता बी. कुलकर्णी आणि सदस्य संध्या बादलिंगे व किरण आर. ठोले यांनी दिला आहे. 

अर्जदाराची वैजापूर तालुक्‍यातील सटाणा शिवारातील गट नंबर 45 मध्ये चार एकर 28 गुंठे शेती आहे. तेथे शेती पंपासाठी विद्यूत जोडणीसाठी त्यांनी 2014 मध्ये अर्ज केला होता. त्यांनी कोटेशनप्रमाणे सहा हजार तीनशे रुपये 11 जून 2016 रोजी महावितरणकडे जमा केले आहेत. मात्र, अद्याप अर्जदारास विद्युत पुरवठा दिलेला नाही. अर्जदाराने बरेच प्रयत्न केल्यानंतर महावितरणने अर्जदाराच्या विहीरीजवळ दोन विद्युत खांब रोवले. मात्र, विद्युत जोडणी दिली नाही. परिणामी नगदी पीक घेता न आल्यामुळे दरवर्षी एक लाख रुपये नुकसान झाल्याचे अर्जदाराचे म्हणणे होते. 

2015-16 या आर्थिक वर्षात महावितरणकडे विद्युत जोडणीसाठीचे 187 अर्ज प्रलंबीत आहेत. ज्येष्ठताक्रम डावलून अर्जदाराची मागणी पूर्ण करता येणार नाही, असे महावितरणचे म्हणणे होते. सुनावणीअंती गैरअर्जदार महावितरणच्या सेवेत त्रुटी असल्याचे मत नोंदवित मंचाने वरीलप्रमाणे आदेश दिला. तक्रारदारातर्फे ऍड. आर.पी. पटवर्धन यांनी काम पाहिले.

Web Title: consumer court order to electricity board

टॅग्स