दूषित पाण्यामुळे महिलांची टाकीवर धाव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

सिडको एन-१ येथून टॅंकरद्वारे मिळणारे पाणी गढूळ असून, पिण्यायोग्य नाही. त्यामुळे सिडको एन-७ येथूनच टॅंकरने पाणी देण्यात यावे, अशी मागणी करत जटवाडा रोड परिसरातील राधास्वामी कॉलनी भागातील महिलांनी बुधवारी (ता. १७) दुपारी टाकीवर धाव घेतली.

औरंगाबाद -  सिडको एन-१ येथून टॅंकरद्वारे मिळणारे पाणी गढूळ असून, पिण्यायोग्य नाही. त्यामुळे सिडको एन-७ येथूनच टॅंकरने पाणी देण्यात यावे, अशी मागणी करत जटवाडा रोड परिसरातील राधास्वामी कॉलनी भागातील महिलांनी बुधवारी (ता. १७) दुपारी टाकीवर धाव घेतली. यावेळी एकही जबाबदार अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांकडे कैफियत मांडत दोन तास ठिय्या दिल्यानंतर महिला माघारी फिरल्या.

सिडको एन-सात व एन-पाच येथील पाण्याच्या टाकीवरील टॅंकरचा भार कमी करण्यासाठी महापालिकेने एमआयडीसीकडून पाणी घेतले आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या पुढाकारानंतर एमआयडीसीने सिडको एन-१ येथे टॅंकर भरून देण्यासाठी सोय करून दिली. मात्र एमआयडीसीचे पाणी दूषित असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. जटवाडा रोडवरील राधास्वामी कॉलनीत चार दिवसांपूर्वी एन-१ येथून टॅंकरचे पाणी देण्यात आले होते. मात्र, हे पाणी गढूळ असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर पुढील वेळी चांगले पाणी येईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, आज या भागात टॅंकर येणार असल्याने महिलांनी थेट एन-सात येथील पाण्याच्या टाकीवर धाव घेत येथूनच आमच्या भागात टॅंकर पाठवा, अशी मागणी केली. दोन तास महिलांनी ठिय्या दिला. मात्र, अधिकारी हजर नसल्याने कर्मचाऱ्यांकडे कैफियत मांडून महिला घराकडे परतल्या. यावेळी शांताबाई औताडे, मनीषा औताडे, सुनीता काचेवाड, वेणूताई काचेवाड, संगीता काचेवाड यांच्यासह २० ते २५ महिलांची उपस्थिती होती.

एमआयडीसीचे पाणी नको
एमआयडीसीचे पाणी पिण्यायोग्य नाही. आमच्या भागात गोरगरीब लोक राहतात. त्यांची जारचे पाणी विकत घेण्याची ऐपत नाही. त्यामुळे सिडको एन-७ येथून पिण्यायोग्य पाणी मिळावे, अशी मागणी महिलांनी केली. 

Web Title: contaminated water in aurangabad