औरंगाबादवर दूषित पाण्याचे संकट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

  • नाथसागरावरील हिरवा तवंग कायम 
  • शुद्धीकरणासाठी डोस वाढवूनही गढूळ पाणी 

औरंगाबाद - शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. काठोकाठ भरलेल्या नाथसागरातील पाण्यावर हिरवा तवंग असून, हे पाणी शुद्ध करून शहरात पुरवठा करताना महापालिकेच्या नाकीनऊ येत आहेत. केमिकल, तुरटीचे डोस वाढवूनही पाण्यातील गढूळपणा कमी होत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे जलसंपदा विभागाने याप्रकरणी हात वर केले आहेत. 

शहराच्या पाणीपुरवठ्यावर कधी तांत्रिक कारणामुळे, तर कधी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे संकटे येत आहेत. उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे गेलेल्या नागरिकांना नाथसागर भरल्यानंतर तरी मुबलक पाणी मिळेल, अशी अशा होती; मात्र गेल्या महिन्यापासून गढूळ पाण्यामुळे महापालिकेसमोरील अडचणी वाढल्या आहेत. तळ गाठलेल्या नाथसगारात नाशिक भागात झालेल्या पुराचे पाणी दाखल झाले. आठ ऑगस्टला नाथसागर पूर्ण क्षमतेने भरला; मात्र पाणीपुरवठ्यातील अडथळे सुरूच होते. फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील एक पंप जळाल्याने पाणी उपसा करण्यास अडचण निर्माण झाली. त्यानंतर नाथसागरातील पाण्यावर हिरव्या रंगाचा तवंग आला. हा तवंग कशामुळे आला, याचा शोध अद्यापही लागलेला नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून धरणातील पाणी हिरवे झाले असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हे हिरवे पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटी, ब्लिचिंग पावडरची मात्रा वाढविण्यात आली आहे; मात्र त्यानंतरही शहरातील नळांना पाणी पिवळे व गढूळ येत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. 
  
जलसंपदा विभागाने केले हात वर 
नाथसागरातील पाण्यावर हिरवा तवंग कशामुळे आला, याची कारणे शोधणे गरजेचे असताना, जलसंपदा विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाने अद्याप दखल घेतलेली नाही. उलट शहराला शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे. त्यांनी पाणी शुद्धीकरणावर भर दिला पाहिजे, असे दोन्ही विभागांचे अधिकारी खासगीत सांगत आहेत. त्यामुळे महापालिकेची कोंडी झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contaminated water in Aurangabad