औरंगाबाद शहराला होतोय दूषित पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

औरंगाबाद - शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने तसेच दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत दाखल याचिकेत डीएमआयसीला प्रतिवादी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी दिले. तसेच शासनाला डीएमआयसीच्या जलवाहिनीवरून शहराला पाणीपुरवठा करण्याविषयी माहिती सादर करण्यास सांगितले. 

औरंगाबाद - शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने तसेच दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत दाखल याचिकेत डीएमआयसीला प्रतिवादी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी दिले. तसेच शासनाला डीएमआयसीच्या जलवाहिनीवरून शहराला पाणीपुरवठा करण्याविषयी माहिती सादर करण्यास सांगितले. 

इर्षाद मोहम्मद खान (दिवाणदेवडी) यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, पाणीपुरवठा करताना काही भागांत तीन तास तर इतर ठिकाणी २० मिनिटे पुरवठा होतो. पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्याने, विद्युत मोटार लावूनही पाणी येत नाही. अनेक भागांत कायम जलसंकट आहे, तर काही भागांत दूषित पाणीपुरवठा होतो. त्यांनी महापालिकेकडे यासंदर्भात तक्रार देत निराकरण करण्याची विनंती केली. मात्र, काहीच कारवाई न झाल्याने त्यांनी याचिकेद्वारे पाणीपुरवठा समस्येकडे न्यायपालिकेचे लक्ष वेधले. 

...म्हणून फुटताहेत जलवाहिन्या 
महापालिकेने सदर याचिकेत ता. २८ नोव्हेंबर २०१७ आणि १७ जानेवारी २०१८ रोजी शपथपत्र दाखल केले. त्यात पाणीपुरवठा योजनेचे स्वरूप, जलवाहिनीची दयनीय अवस्था, जीर्ण झालेल्या जलवाहिनीचे आव्हान, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने पाण्याचा प्रवास होत असल्याने जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण, लोकसंख्या वाढ याविषयीची माहिती सादर करण्यात आली. शहराला वर्ष २०४१ पर्यंत प्रतिदिन ३९२ दलघमी पाणीपुरवठा व्हावा यासाठी समांतर योजना तयार करण्यात आली. केंद्र सरकारने या योजनेसाठी वर्ष २००५-०६ मध्ये ३६० कोटी रुपये मंजूर केले. पण, या योजनेला न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने ती न्यायालयीन प्रक्रियेत अडकली आहे. आता या योजनेचा खर्चही वाढल्याचे म्हणणे महापालिकेने मांडले. 

...तर शहरात येईल पाणी
डीएमआयसीला पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र ३०० दलघमी जलवाहिनीचे काम करण्यात आले आहे. सध्या डीएमआयसीचे काम पूर्ण व्हायला वेळ असून, तोपर्यंत सदर जलवाहिनीद्वारे शहराला पाणीपुरवठा करता येऊ शकतो. त्यामुळे फारोळा जलशुद्धीकरण केंद्रापासून ही जलवाहिनी जोडल्यास शहराला पुरवठा करता येईल, असे महापालिकेने सुनावणीदरम्यान निदर्शनास आणून दिले. याचिकेवर १५ जानेवारी २०१९ रोजी पुढील सुनावणी होईल.

Web Title: Contaminated water supply in aurangabad city