औरंगाबाद : पाण्याचा नव्हे आजाराचा पुरवठा; नळाला ड्रेनेजचे पाणी

अतुल पाटील
रविवार, 14 जुलै 2019

पाणी हे जीवन आहे. पण, बहुतांश आजार हे पाण्यातून पसरतात. त्यामुळे शुद्ध पाणी पिणेच हिताचे आहे. असे असताना औरंगाबाद महापालिकेकडून एसटी काॅलनीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

औरंगाबाद - महापालिकेचे पिण्याचे पाणी नऊ दिवसाआड येत आहे. तेही केवळ अर्धा तास. राग येण्यासारखी गोष्ट म्हणजे, ते पाणीही अक्षरश: ड्रेनेजचे आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत. हा प्रकार एन-2 येथील न्यू एसटी कॉलनी येथे घडत आहे. याविरोधात नागरिकांनी महापौरांनाही निवेदन दिले आहे. 

शहरात कमीत कमी सहा दिवसांआड येणारे पाणी न्यू एसटी कॉलनीत चक्‍क नऊ दिवसांआड येत आहे. गेल्या तीन वेळेस पिण्याचे पाणी येणाऱ्या नळातून ड्रेनेजचे पाणी आले आहे. काळे, पिवळे पाणी असून, त्याचाही घाण वास आहे. फेस आलेले पाणी पाहूदेखील शकत नाहीत. पिण्यायोग्य पाण्यासाठी पुन्हा पाण्याचे टॅंकर मागवावे लागत आहेत. केवळ अर्धा तास आणि कमी दाबाने येणारे पाणी येथील नागरिकांना पुरत नाही. पाणी येण्याची वेळही निश्‍चित नाही. मध्यरात्रीही पाणी भरण्यचा त्रास सहन करावा लागत आहे. आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये रस्ते, पाणी सुविधा मिळत असून, आमच्याच गल्लीत हा गोंधळ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दूषित पाणी आमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. यावर वेळीच तोडगा काढण्यात यावा, असा सुर निवेदनात आहे. 

निवेदनावर आर. डी. गिरी, शंकर सावंत, आशा परदेशी, मीनाबाई कुबेर, वैजिनाथ कुबेर, किसन काळे, सोपान निकम, भाभी शेख, अशोक मोगल, अशोक शहाणे, रामेश्‍वर पदार, पूजा बल्लाळ, सौरभ यादव, संध्या चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contaminated water supply in ST colony