सततच्या पावसाने पिके पडली पिवळी

विकास पाटील
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

बनोटी (जि.औरंगाबाद) ः चार वर्षांपासून अवर्षणाचा सामना केल्यानंतर बनोटी (ता. सोयगाव) परिसरात यंदा गेल्या काही दिवसांत सलग झालेल्या पावसाने शेतातील आंतरमशागतीची कामे रखडली आहेत. पिकांमध्ये गवत उगवले आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडू लागली आहेत.

बनोटी (जि.औरंगाबाद) ः चार वर्षांपासून अवर्षणाचा सामना केल्यानंतर बनोटी (ता. सोयगाव) परिसरात यंदा गेल्या काही दिवसांत सलग झालेल्या पावसाने शेतातील आंतरमशागतीची कामे रखडली आहेत. पिकांमध्ये गवत उगवले आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडू लागली आहेत.

यंदा जुलै महिन्यातील पंधरवडा सोडला तर परिसरात सलग पाऊस होत आहे. सततच्या पावसाने जमिनीचा वाफसा होत नसल्याने कोळपणी, वखरणी, निंदणी व फवारणीची कामे न झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. मक्‍यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन खर्चही निघणार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाची उघडीप मिळत नसल्याने उडीद, मुगाला लागलेल्या शेंगा तोडण्यास विलंब होत असल्याने शेंगा फुटून नुकसान होत आहे.प्रशासनाने बांधावर जाऊन पंचनामे करावेत आणि यासंदर्भातील अहवाल विमा कंपनी व शासनाला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

 

दोन एकर क्षेत्रातील कपाशी पिवळी पडून वाळून जात आहे. शिवारात नजर मारावी तिकडे पाणीच पाणी दिसते. त्यामुळे शेतात जाण्याचे कामच राहिलेले नाही. शेतीत केलेला उत्पादन खर्चदेखील निघणार नसल्याने संसाराचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न पडला आहे.
- भाऊसाहेब सोनवणे, शेतकरी, बनोटी

बनोटी मंडळात यावर्षी 65 मिमीपेक्षा जास्त पाऊस एका दिवसात पडलेला नाही; मात्र दररोज पडणाऱ्या पावसामुळे अशी परिस्थिती ओढवली आहे. वरिष्ठांना याबाबत कळविले आहे. वरिष्ठांकडून आदेश मिळताच पंचनामे करून अहवाल पाठविला जाईल.
- डी. पी. खरात, तलाठी, बनोटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Continuous Rain Affect Crops