ठेकेदार अनुपस्थित, कामगारच बनवताहेत जळगाव रस्ता

अतुल पाटील
Saturday, 9 November 2019

जळगाव रस्त्यावर इतभर खोल खड्डे पडले असून ते बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला खरा. मात्र, अख्ख्या रस्त्याची चाळण झाली असताना डांबर शिपडून नुसत्या दगडांच्या "पाट्या' टाकल्या जात आहेत.

औरंगाबाद : वसंतराव नाईक चौक ते हर्सुल टी पॉईंट दरम्यानच्या जळगाव रस्त्यावर इतभर खोल खड्डे पडले असून ते बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला खरा. मात्र, अख्ख्या रस्त्याची चाळण झाली असताना डांबर शिपडून नुसत्या दगडांच्या "पाट्या' टाकल्या जात आहेत. विशेष म्हणजे ठेकेदार उपस्थित नसून आम्हीच रस्ता बनवत असल्याचे तिथल्या कामगारानी सांगितले.

Jalgoan Road Photo

जळगाव रस्त्यावर पावसाने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर डांबरी रस्त्यातून निखळलेल्या खडीची माती होऊन या रस्त्यावर प्रचंड धुळ निर्माण होत आहे. खड्डे चुकविताना आणि डोळ्यात धुळ गेल्याने या रस्त्यावर नेहमीच छोटे-मोठे अपघात घडत आहेत. आठवड्यापासून पाऊस नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मात्र, ज्या ठेकेदाराने काम हाती घेतले आहे. त्यांच्या अनुपस्थितीतच कामगार रस्ता बनवत आहेत.

Jalgaon Road Photo

डांबराचे केवळ शिंतोडे

कामगार बनवत असलेल्या रस्त्याच्या दर्जाबाबत नागरिक शंका घेत आहेत. इतभर ते फुटभर पडलेल्या खड्ड्यात मोठी खडी ओतत आहेत. यात डांबराचे केवळ शिंतोडे टाकले जात आहेत. रस्त्यावरील माती देखील नीट काढली जात नाही. सटकणाऱ्या खडीमुळे रोलरने दबाई करुनही त्यावरुन चालताना पाय रुतत आहेत. घाईगडबडीत रस्ता होत असल्याने आणि पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचा प्रवाह लक्षात न घेता बनत असल्याने तो किती दिवस टिकेल, याचीही शंका येत आहे.

Jalgaon Road Photo

आधी बोलले, नंतर गप्प
रस्ता तयार केला जात असताना "सकाळ'च्या प्रतिनिधीने तिथे नेतृत्व करत असलेल्या एका व्यक्‍तीला ठेकेदार कोण आहेत? असे विचारले. त्यावेळी इथे कुणीच ठेकेदार नाही. आम्ही सगळे कामगार आहोत. आम्ही काय तुमच्याशी बोलणार? असे उत्तर दिले. त्यानंतर ठेकेदाराविना काम सुरु आहे का? या प्रश्‍नावर ठेकेदार घरी जेवायला गेल्याचे सांगितले. यावेळी दुपारचे साडेचार वाजले होते. एवढे बोलल्यानंतर मात्र, त्यांनी पुढच्या सगळ्याच प्रश्‍नांची उत्तरे देणे टाळले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contractor Absent, Workers Making Jalgaon Road In Aurangabad