सावकारांच्या जाचाने कंत्राटदाराची आत्महत्या

सावकारांच्या जाचाने कंत्राटदाराची आत्महत्या

कन्नड - व्याजाने घेतलेले पैसे परत दिल्यानंतरही सावकार पैशांसाठी त्रास देऊन ठार मारण्याची धमकी देत असल्याने कंत्राटदाराने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शहरातील हॉटेल रामकृष्ण महल येथे घडली. भाऊसाहेब काशीनाथ घुगे (वय ५०) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी कन्नड शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (ता. सोळा) सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास हॉटेल रामकृष्ण महल येथील खोली क्रमांक १०३ मध्ये मेहेगाव येथील कंत्राटदार भाऊसाहेब घुगे यांनी पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. 

आत्महत्येपूर्वी त्यांनी चार पानांची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात सुभाष रामगोपाल भारुका, संदेश सुभाष भारुका (दोघेही रा. कन्नड), विष्णू किसन कळागते (रा. केडगाव, जिल्हा नगर), अशोक भाऊसाहेब पानकडे (रा. गंगापूर) या चौघांकडून घेतलेले पैसे परतही दिले. मात्र, चौघेही पैसे परत न दिल्याचे सांगून ठार मारण्याची धमकी देत होते.  शिवाय सुभाष भारुका, संदेश भारुका हे भाऊसाहेब घुगे न्यायालयात तारखेस गेल्यानंतर तेथेही धमक्‍या देत होते, असे नमूद केले. सदर चिठ्ठी पोलिसांनी हस्तगत केली. भाऊसाहेब यांचे बंधू सुरेश घुगे यांनी कन्नड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चौघांनी पैसे परत घेतल्यानंतरही पैशांसाठी विनाकारण त्रास तसेच ठार मारण्याची धमकी देत आत्महत्या करण्यास भाग पाडले, असे फिर्यादीत म्हटले आहे. भाऊसाहेब घुगे यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दोन्ही भावांसह एकत्रित कुटुंबात ते राहत होते. सर्व व्यवहार भाऊसाहेब हेच बघत असत. सध्या ते औरंगाबादला वास्तव्यास होते. दोन ते तीन दिवसांआड ते घरी जात असत. 

समजूत घातल्‍यानंतर मृतदेह घेतला ताब्यात
भाऊसाहेब व त्यांचा मित्र यांनी मंगळवारी रात्री हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर मित्राने भाऊसाहेब यांना हॉटेल रामकृष्ण महल येथे आणून सोडले. तेव्हा भाऊसाहेब यांनी मित्रास सकाळी सात ते आठच्या दरम्यान परत ये, असे सांगून आपणास कामावर जायचे असल्याचे सांगितले. बुधवारी सकाळी सातला मित्र हॉटेलवर गेले असता त्यांनी दरवाजा उघडला नाही. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी ते झोपलेले आहेत, थोड्या वेळाने या, असे सांगितले. बऱ्याच वेळानंतर कर्मचाऱ्याने दार ठोठावले. मात्र, आतून प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा उघडून बघितला असता भाऊसाहेब पंख्याला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. उत्तरीय तपासणीनंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी नातेवाइकांची समज काढून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यांच्यावर मेहेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तहसीलदार महेश सुधळकर, माजी आमदार नितीन पाटील, नामदेव पवार, उदयसिंग राजपूत, अशोक मगर, केतन काजे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com