रुग्णांनाच घेऊन जावा लागतो कूलर, पंखा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

परंडा येथील उपजिल्हा रुग्णालय - उकाड्यापासून सुटकेसाठी स्वतःच करावी लागते व्यवस्था

परंडा - ऐन उन्हाळ्यात येथील उपजिल्हा रुग्णालयातील पंखे बंद असल्याने रुग्णांना घरूनच पंखे, कूलर घेऊन रुग्णालयात जावे लागत आहे. नादुरुस्त पंख्यामुळे रुग्णांना विशेषतः प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

चांगले उपजिल्हा रुग्णालय अशी परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयाची ओळख आहे. अनेक पुरस्कार या रुग्णालयाला मिळालेले आहेत. त्यामुळे या भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या रुग्णालयाविषयी अपेक्षा वाढल्या आहेत. दर्जेदार सेवेमुळे आरोग्य विभागाच्या प्रत्येक योजनेला तालुक्‍यात प्रतिसाद मिळत आहे. असे असताना काही दिवसांपासून रुग्णांना रुग्णालयातील गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयाच्या काही वॉर्डांतील विजेचे पंखे नादुरुस्त असल्याने उन्हाळ्यात रुग्णांचे हाल होऊ लागले आहेत. 

मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना विकत पाणी घ्यावे लागते. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने उष्णता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयातील पंखे बंद असल्याने रुग्णांना मोठ्या प्रमाणात उकाडा सहन करावा लागतो. 

अनेक रुग्ण ही गैरसोय ओळखून घरूनच पंखे घेऊन  येत आहेत. रुग्णांच्या विभागातील पंखे तत्काळ सुरु करावेत, अशी मागणी   रुग्णांच्या नातेवाइकांकडून होत आहे.

उपजिल्हा रुग्णालयातील महिला विभागातील पंखे बंद असल्याने तीव्र उन्हामुळे महिला रुग्णांचे हाल होत आहेत. माझ्या पत्नीला रुग्णालयात दाखल केले असून, पंख्याच्या गैरसोयीमुळे नवा कूलर घ्यावा लागला.
- राजू कोळगे, रुग्णाचे नातेवाईक, परंडा

Web Title: The coolers, the fan, go to the patients