Corona Breaking परभणी जिल्ह्यात दिवसभरात दोघांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 July 2020

जिल्ह्यात कोरोना संसर्गाने धुमाकुळ घालण्यास सुरुवात केली असून सोमवारी (ता.१३) दोन कोरोना बाधित व्यक्तींचा मृत्यु झाला तर २१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे. 

परभणी ः जिल्ह्यात कोरोना संसर्गाने धुमाकुळ घालण्यास सुरुवात केली असून सोमवारी (ता.१३) दोन कोरोना बाधित व्यक्तींचा मृत्यु झाला तर २१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे. मयत झालेल्यांमध्ये ४५ वर्षीय इसम व पाथरी शहरातील ६५ वर्षीय कोरोनाग्रस्ताचा समावेश आहे. यात रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये नऊ रुग्ण सापडले आहेत. तर इतर बारा रुग्ण आढळले आहेत. १२ रुग्णांमध्ये परभणी शहरात दोन महिला व सात पुरुष, मानवत, सेलू व पाथरी शहरात प्रत्येकी एक पुरुष रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता २८२ वर गेली आहे. त्यापैकी १२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण मृत्यु आठ झाले आहेत. सोमवारी (ता.१३) जिल्ह्यातील पाच व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत.

कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची माहितीसाठी उडते भंबेरी...
सेलू ः शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मागच्या आठवड्यात कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्यामुळे महसूल, पोलिस व आरोग्य विभागासह नगर परिषद तसेच ग्रामीण भागातील ग्रामपंचायत प्रशासन हवालदिल झाले आहे. कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती सर्वांपर्यंत व्हॉटसअप व इतर सोशल मिडियावरुन पसरते. परंतू, प्रत्यक्षात कोरोना बाधिताच्या सविस्तर माहितीसाठी सर्वांचीच भंबेरी उडतांना दिसत आहे. शहरात एकूण सात ठिकाणी प्रतिबांधित क्षेत्र घोषित केले आहेत. सोमवारी (ता.१३) सायंकाळी सर्वोदय नगरातील कोरोना बाधित आढळून आलेला रुग्ण दोन दिवसांपूर्वी कोरोना पाॅझिटिव्ह पोलिस कर्मचाऱ्याच्या संपर्कातील असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

हेही वाचा - जिल्ह्याची कोरोना बाधित संख्या नियंत्रणात तरी योग्य नियोजन करा, कोण म्हणाले वाचा...

गंगाखेड येथे कोरोनाचा शहरवासीयांना ‘दे धक्का’ 
गंगाखेड: शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्याने लग्नसोहळ्याप्रीत्यर्थ स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. स्वागत समारंभाच्या कार्यक्रमास राजकीय, प्रशासकीय अधिकारी, प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती होती. या व्यापाऱ्याच्या परिवारातील ६० वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर संपर्कातील व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली असता तालुक्यातील रुग्णांची संख्या ६६ वर पोचल्यामुळे गंगाखेड शहरात कोरोनाग्रस्तांनी ‘दे धक्का’ तंत्राचा वापर केल्याची चर्चा तालुकावासीयांत होत आहे. लग्नसोहळ्यानिमित्त स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन कोरोनाग्रस्त महिलेच्या परिवाराने केले होते. सदरील प्रतिष्ठितांच्या कार्यक्रमास शहरातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करून त्यांचे स्वॅब तपासणीअंती दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून सोमवारी (ता.१३) रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून आरोग्य प्रशासनाच्या वतीने दुपारपर्यंत ३१ व्यक्तींची तपासणी केली असता यापैकी आठ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्यामुळे गंगाखेड तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या ६६ वर पोचली असल्यामुळे कोरोनाने दे धक्का तंत्राचा वापर केला असल्याची चर्चा होत आहे. 

हेही वाचा -  शेतकऱ्यांच्या तक्रारी ठरल्या खऱ्या, सोयाबीन बियाणाची उगवण क्षमताच नसल्याचे उघडे...

जिंतूर तालुक्यात अठराजणांचे विलगीकरण 
जिंतूर : शहरातील वरूड वेशीतील खासगी शिकवणी घेणारे एक शिक्षक कोरोनाबाधित असल्याचा अहवाल गुरुवारी (ता. नऊ) प्रशासनास प्राप्त झाला होता. त्यावरून शिक्षकाच्या कुटुंबातील आठजण व दोन शेजारी असे दहाजणांचे विलगीकरण करण्यात आले. त्यात शनिवारी, रविवारी (ता. ११ व १२) आणखी आठजणांची भर पडल्याने एकूण अठरा नागरिकांचे विलगीकरण करण्यात आले. 
शहरातील वरूड वेस भागातील जागृत हनुमान मंदिर परिसरातील खासगी शिकवणी घेणाऱ्या एका ४८ वर्षीय शिक्षकाची प्रकृती खराब असल्याने ते सहा जुलैला परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले असताना त्यांचा स्वॅब घेऊन तो प्रयोगशाळेला पाठविला होता. प्रशासनाकडे त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सदर रुग्णाच्या कुटुंबातील आठ सदस्य, दोन शेजारील नागरिकांचे विलगीकरण करण्यात आले होते. सदरील शिक्षकाने परभणीला जाण्यापूर्वी शहरातील एका खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचा सल्ला घेतला होता म्हणून त्या वैद्यकीय अधिकाऱ्यासह त्यांचा सहायक यांचेही विलगीकरण करण्यात आले. तर याच शिक्षकाने (ता. एक) जुलै रोजी राहत्या घरी एका बचतगटाच्या सदस्यांची बैठक घेतली होती. या बैठकीस उपस्थित असणाऱ्या एका महिलेसह इतर सहाजणांना रविवारी (ता.१२) विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्यामुळे विलगीकरण कक्षात ठेवलेल्या नागरिकांची संख्या आता अठरा झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आली. 

परभणी जिल्हा 
एकूण बाधित ः २८२ 
आजचे पॉझिटिव्ह ः २१ 
आजचे मृत्यू ः दोन 
एकूण बरे झालेले ः १२१ 
एकूण मृत्यू ः आठ 
उपचार सुरू असलेले ः १५३ 

(संपादन ः राजन मंगरुळकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Breaking Both died in a day in Parbhani district, parbhani news