Corona Breaking, परभणीत तीन रुग्णांचा मृत्यू, १२२ पॉझिटिव्ह

गणेश पांडे
Sunday, 16 August 2020

जिल्ह्यात रॅपिड टेस्ट सर्वच तालुक्याच्या ठिकाणी घेतल्या जात आहेत. त्यातून बऱ्याच प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. तसेच परभणीत रविवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला तर १२२ पॉझिटिव्ह जिल्ह्यात आढळले.  

परभणीः जिल्ह्यात रविवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. आतापर्यंत एकूण मृतांची संख्या ७८ इतकी झाली आहे. तसेच १२२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 

महापालिकेने शहरातील तेरा केंद्रावर घेतलेल्या एक हजार १७ रॅपिड अँटीजन टेस्टपैकी ९८९ टेस्ट निगेटिव्ह आल्या तर फक्त २८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. रविवारी (ता. १६) सिटी क्लब ७६ जणांची तपासणी केली, त्यात तीन जण, आयएमए हॉल येथे ७६ जणांपैकी सहा, नवा मोंढा येथील मार्केट कमिटीत ७० पैकी दोन, अपना कॉर्नर येथील वाचनालयात ७० पैकी दोन, साखला प्लॉट येथे ४९ पैकी तीन, वकील कॉलनी येथील औषधी भवनात ११९  पैकी तीन, जागृती मंगल कार्यालय येथे ९० पैकी शुन्य, खंडोबा बाजार येथील आरोग्य केंद्रात ५० पैकी एक, जायकवाडी येथील मनपाच्या आरोग्य केंद्रात ७७ पैकी शून्य, सय्यद तुराबुल हक्क नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ५९ पैकी दोन, जिंतूर रस्त्यावरील नुतन विद्यालयात ५० पैकी शुन्य, खानापूर येथील आरोग्य केंद्रात ९३ पैकी दोन, नानलपेठ येथील बाल विद्या मंदिरात ९७ पैकी चार जण पॉझिटिव्ह आले. परभणी महापालिकेने विविध केंद्रांवर घेतलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये शनिवारी २१ जण बाधित आढळून आले.  

जिंतूरला रविवारी चार व्यापारी पॉझिटिव्ह 
जिंतूरः शहरातील अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृतह येथे रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे तपासणीत रविवारी (ता.१६) चार व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले. यापूर्वी व्यापारी व त्यांच्या कुटुंबातील मिळून सोळाजण याप्रमाणे चार दिवसांत वीसजण बाधित रुग्ण आढळून आले. शनिवारपासून महसूल व आरोग्य विभागातर्फे शहरातील किराणा, कापड व अन्य व्यापाऱ्यांसह फळे, भाजीपाला, मटण विक्रेते तसेच ऑटो व टॅक्सीचालक याप्रमाणे रोज साठ जणांची रॅपिड टेस्ट किटद्वारे तपासणी करण्यात येत असून शनिवारी साठ तर रविवारी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड यांच्या विनंतीवरून शंभर व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली. पहिल्या दिवशी सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले मात्र (ता.१६) तपासणीमधून एक फुटवेअर विक्रेता, एक भुसार विक्रेता, एक संगणकचालक व अन्य एक या व्यापाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली. 

परभणीत शनिवारी २१ जण बाधित 
शनिवारी सिटी क्लब येथे ९९ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोघे बाधित असल्याचे आढळून आले. महापालिका रुग्णालयात ५० पैकी तीन, आयएमए हॉल येथे ७५ पैकी एक, रोकडा हनुमान मंदिरात ७५ पैकी सहा, मनपा वाचनालयात ९१ पैकी एक, औषधी भवन येथे १३० पैकी चार, जागृती मंगल कार्यालयात १०२ पैकी एक, खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७३ पैकी तीन रुग्ण आढळून आले. खंडोबा बाजार व साखला प्लॉट येथील केंद्रांवर ४० जणांची तपासणी करण्यात आली, त्या सर्वांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या. दिवसभरात एकूण ७३५ जणांच्या टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी २१ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. 

हेही वाचा - एकीकडे पावसाची रिपरिप, दुसरीकडे सोयाबीनवर कीड तर अन्यत्र जनावरांना लंपी स्क्रीन आजार

पालमला दहाजण पॉझिटिव्ह 
पालम ः शहरातील नगरपंचायतद्वारे घेण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीत तालुक्यातील दहा जणांना या रोगाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली. शहरातील व्यापारी, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते, रिक्षा व टॅक्सीचालक यासह सर्वांना १७ ऑगस्टपर्यंत रॅपिड अँटीजेन टेस्ट करणे बंधनकारक केल्यामुळे आदिवासी आश्रमशाळेत रविवारी नगरपंचायतद्वारे आयोजित केलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये तब्बल दहाजण पॉझिटिव्ह आढळून आले. 

हेही वाचा - रिमझिम पावसाने सुखावले हिंगोलीकर...

अँटीजेन चाचणीत परिचारिका बाधित 
सेलू ः तालुक्यातील वालूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी घेण्यात आली. यावेळी आरोग्य केंद्रातील कार्यरत ३५ वर्षीय परिचारिका कोरोना बाधित आढळून आली. दरम्यान, रॅपिड अँटीजेन चाचणीत सेलू शहरातील मारोती नगरातील ३६ वर्षीय व्यक्ती व वालूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील ३५ वर्षीय परिचारिका बाधित आढळून आल्यामुळे शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे दिवसेंदिवस चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वालूर (ता.सेलू) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील तसेच या आरोग्यअंतर्गत येत असलेल्या उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून गावातील औषधी दुकानचालक, व्यापारी यांची रॅपिड चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश वाठोरे यांनी दिली. 

संपादन ः राजन मंगरुळकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Breaking, death of three patients in Parbhani, 122 positive, Parbhani News