Corona Breaking ; हिंगोलीत एकाचा मृत्यू, चोवीस पॉझिटिव्ह

corona
corona

हिंगोली ः जिल्ह्यातील आयसोलेशन वॉर्ड येथे उपचार सुरु असलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा मंगळवारी (ता.अकरा) मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीवास यांनी सांगितले. तर जिल्ह्यामध्ये नव्याने एकूण चोवीस कोरोना रुग्ण आढळून आले. त्यापैकी सतरा हे रेपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे व सात रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले. तर दहा रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यात एकुण ८९७ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ६४७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला एकूण २४९ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि दहा रुग्णांचा आतापर्यंत मृत्यु झाला.

येथील सरजूदेवी भिकुलाल व माणिक स्मारक विद्यालयात मंगळवारी (ता. ११) घेण्यात आलेल्या फळविक्रेते व भाजीविक्रेते यांच्या अँटीजेन टेस्टमध्ये पाच विक्रेते पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरुवाडे यांनी दिली आहे.  चार दिवसांपूर्वी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली शहर व परिसरातील ग्रामीण भागात अँटीजेन टेस्ट घेण्याचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार मंगळवारी येथील माणिक स्मारक व सरजूदेवी विद्यालयात शहरातील फळविक्रेते, भाजी विक्रेते यांची अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. यावेळी ३५२ व्यापाऱ्यांनी तपासणी केली. यात पाच व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले, तर उर्वरित ३४७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. पॉझिटिव्ह व्यापाऱ्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले; तसेच ग्रामीण भागातील फळविक्रेते यांना देखील अँटीजेन टेस्ट तपासणी करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय शहरामध्ये फळ-भाजी विक्री करता येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांनी तपासणी करून घेतली अशांना दुकाने उघडी ठेवता येतील, ज्यांनी अँटीजेन तपासणी केली नाही त्यांनी पालिका प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरुवाडे यांनी केले आहे. 
 
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी कोरोनामुक्त 
हिंगोली : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी हे दोन ऑगस्टला कोरोनाबाधित ठरले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचारानंतर ते बरे झाले असून मंगळवारी (ता.११) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्यासह डॉक्टर, परिचारिका आदी उपस्थित होते. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जयवंशी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी, सर्व डॉक्टर्स, परिचारिका, अन्य सेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांनी आभार मानले.

कळमनुरीत रॅपिड टेस्टमध्ये सात पॉझिटिव्ह 
कळमनुरी : उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी (ता.११) किराणा व्यापाऱ्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली. यात सातजण पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये एक व्यापारी व संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सहा नागरिकांचा समावेश आहे. किराणा व्यापारी व नागरिक अशा एकूण ११३ जणांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली. तपासणीकरिता आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद मेने, डॉ. बालाजी जाधव, डॉ.महेश पंचलिंगे, डॉ.सोफिया खान, डॉ.सुषमा टाक, डॉ. कलावती मस्के, डॉ. बालाजी मिजगर, डॉ. शिवाजी माने, कैलास ताटे, सर्जेराव नाईक यांनी तपासणीसाठी पुढाकार घेतला. त्यांना कोविडसमर्पित आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. विविध क्षेत्रांतील व्यापारी सहभागी झाले होते. काही व्यापाऱ्यांनी तपासणीकडे पाठ फिरवल्याची चर्चा व्यापारी वर्गामधून होत आहे. 

वसमतला एकजण पॉझिटिव्ह 
वसमत ः सोमवारी (ता.दहा) रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण २३८ रॕपिड अँटीजेन तपासण्या करण्यात आल्या असून, यापैकी केवळ एकजण पॉझिटिव्ह आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली. उपविभागीय अधिकारी यांच्या सूचनेनुसार वसमत शहारात अँटीजेन तपासणीचे वेळापत्रक तयार केले आहे. सोमवारी दूधडेअरीचालक व कृषिसेवाचालकांची तपासणी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.सनाउला खान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. यावेळी एकूण २३८ जणांनी अँटीजेन तपासणी करून घेतली त्यात तब्बल २३७ जण निगेटिव्ह तर केवळ एकजण पॉझिटिव्ह आला आहे. वेळापत्रकाप्रमाणे सूचित केलेल्या सर्व व्यापाऱ्यांनी आपली अँटीजेन तपासणी करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी केले. 


हिंगोली जिल्हा 
एकूण बाधित - ८९७
आजचे बाधित - २४
आजचे मृत्यु - एक 
एकूण बरे - ६४७
उपचार सुरु असलेले - २४०
एकूण मृत्यु - दहा 

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com