Corona Breaking ; परभणी जिल्ह्यात सहा रुग्णांचा मृत्यू, २५ पॉझिटिव्ह 

corona
corona

परभणी ः परभणी शहरातील चार तर जिंतूर व मानवत तालुक्यातील प्रत्येकी एक अशा एकूण सहा रुग्णांचा गुरुवारी (ता.१३) जिल्ह्यात मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. यामध्ये गौस कॉलनी येथील ५७ वर्षीय पुरुष, आंबेडकर नगर येथील ७० वर्षीय पुरुष, कुरबान अली शाह नगरातील ६४ वर्षीय पुरुष, खासगी रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या ६० वर्षीय पुरुषाचा, मानवत शहरातील गौड गल्ली येथील १४ वर्षीय मुलीचा आणि जिंतूर शहरातील सबरस मोहल्ला याथील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या ६६ इतकी झाली आहे.    

परभणी महापालिकेच्यावतीने गुरुवारी (ता.१३) शहरातील पाच केंद्रांवर व्यापाऱ्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये २०२ पैकी १२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. शहरातील सिटीक्लब येथे ५०, उद्धेश्‍वर विद्यालयात ५९, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉल येथे ४९, नवा मोंढ्यातील रोकडा हनुमान मंदिर येथे ३२, तर अपना कॉर्नरजवळील वाचनालय येथे १२ व्यापारी, विक्रेत्यांची चाचणी घेण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. 

पाथरीत आज पाच पॉझिटिव्ह रुग्ण 
पाथरी ः तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. गुरुवारी (ता.१३) शहरातील पन्नास व्यापाऱ्यांची अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. यामध्ये दोन व्यापारी व इतर तीन असे पाच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शुक्रवारी (ता.१४) आरोग्य विभाग व नगरपरिषदेच्या वतीने येथील महात्मा फुले मंगल कार्यालयात शहरातील व्यापाऱ्यांची व त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. 

मृत महिलेचा अहवाल कोरोनाबाधित, अंत्यविधीस साठजण उपस्थित 
 पूर्णा ः गौर (ता.पूर्णा ) मृत कोरोनाबाधित महिलेच्या अंत्यविधीस उपस्थित असलेल्या गौर गावकऱ्यांना धडकी भरली आहे. सध्या गावात स्वयंघोषित संचारबंदीसदृश परिस्थिती असल्याचे समजते. गौर येथील एक महिला मृत्यूनंतर कोरोनाबाधित आढळून आल्याची घटना उघडकीस आली. सदरील पंचावन्नवर्षीय महिला कर्करोगाने आजारी होती. बुधवारी (ता.१२) सायंकाळी तिचे निधन झाले. मृत महिलेच्या अंत्यसंस्कारप्रसंगी ५० ते ६० जण उपस्थित होते. एक दिवस अगोदर तिथे दोन कोरोनाबाधित आढळल्याने मृत महिलेचे घर प्रतिबंधित क्षेत्रात होते. प्रतिबंधित क्षेत्रातील मृत महिलेच्या मृत्यूनंतर तत्काळ तपासणीसाठी आरोग्य विभागाने पथक पाठवले असते तर कदाचित सदरील महिलेच्या अंत्यविधीसाठी लोक जमा होऊन त्या मृत महिलेल्या संपर्कात आले नसते. अंत्यविधीचे सर्व विधी पार पाडल्यानंतर अर्ध्या रस्त्यात आरोग्य विभागाचे पथक पोचले व पथकाने मृत महिलेची कोरोनाची रॕपिड अँटीजेन टेस्ट केली. अहवाल येईपर्यंत अंत्यसंस्कार उरकण्यात आले होते. केलेल्या चाचणीतून मृत महिला कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मात्र गौर ग्रामस्थांची व अंत्यविधीस उपस्थित असलेल्या नातेवाइकांची चिंता वाढली आहे. सध्या गावात भीतीचे वातावरण असून अंत्यविधीस उपस्थित असलेले काही जण जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वतःहून क्वारंटाइन झाले आहेत तर काही जण स्वतःच्या घरी. दरम्यान अंत्यसंस्कारास उपस्थित असलेल्यांची शुक्रवारी (ता.१४) रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष अनंतराव पारवे यांनी ‘सकाळ’ला दिली.  

 
गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंतची आकडेवारी 
परभणी जिल्हा 
एकूण पॉझिटिव्ह - १२७६
आजचे पॉझिटिव्ह - २५
आजचे मृत्यू - सहा
एकूण मृत्यू -६६
उपचार घेत घरी परतलेले  - ५१४ 
उपचार सुरू असलेले रुग्ण - ६९६ 

संपादन ः राजन मंगरुळकर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com