esakal | Corona Breaking ; परभणी जिल्ह्यात तीन मृत्यू, ७१ पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

परभणी जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ७१ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात तीन मृत्यू झाले आहेत. शहरात रॅपिड टेस्टला व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये शहरात २८ रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासियांची धाकधूकही वाढली आहे.  

Corona Breaking ; परभणी जिल्ह्यात तीन मृत्यू, ७१ पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः जिल्ह्यात मंगळवारी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काद्राबाद प्लॉट परिसरातील ७२ वर्षीय पुरुष, राठोड गल्ली मानवत येथील ५७ वर्षीय पुरुष तर मानवत पोलिस स्टेशनजवळील ६४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ५४ झाली आहे. तसेच दिवसभरात ७१ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. 
 

रॅपिड टेस्टमध्ये मंगळवारी परभणीत २८ रुग्ण 
परभणी ः महापालिकेला परिसरातील विक्रेते, व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने मौलाना अबुल कलाम आझाद वाचनालयातील रॅपिड टेस्ट सेंटर बंद करावे लागले. तर मंगळवारी (ता.११) दिवसभरात घेण्यात झालेल्या रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये २८ व्यापारी, विक्रेत्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. महापालिकेने सोमवारपासून नव्याने दोन रॅपिड टेस्ट सेंटर सुरू केले होते. त्यापैकी कल्याणनगरातील आयएमएच्या हॉलमधील सेंटरला मोठा प्रतिसाद मिळाला. तर मौलाना अबुल कलाम आझाद वाचनालय येथील केंद्रावर एकही विक्रेता, व्यापारी फिरकला सुद्धा नव्हता. त्यामुळे येथील आरोग्य कर्मचारी दिवसभर त्यांच्या प्रतीक्षेत ठाण मांडून होते. वास्तविक पाहता या वाचनालयाच्या परिसरात मटन मार्केट, मच्छी मार्केट, भाजी मार्केट, भाजीपाला, फळविक्री करणारे ठोकविक्रेते तसेच शेकडोच्या संख्येने किरकोळ विक्रेते, पथविक्रेते आपले व्यवसाय करतात. त्यांच्या सोयीसाठी पालिकेने त्या परिसरात सेंटर सुरू केले होते; परंतु पालिकेच्या या निर्णयाला या परिसरातील विक्रेत्यांनी छेद दिल्याचे बोलले जाते. म्हणून पालिकेने मंगळवारी ते सेंटर रोकड हनुमान मंदिरात हलवले. त्या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात व्यापारी, विक्रेत्यांनी प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा - कोरोनामुळे घरोघरी बनले गोकूळ, सजला कृष्ण अन् नटली राधा...

व्यापाऱ्यांना रॅपिड टेस्ट करण्याचा अल्टिमेटम
महापालिकेने शहरातील विक्रेते, व्यापाऱ्यांना ता.१५ ऑगस्टपर्यंत रॅपिड टेस्ट करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय दुकाने उघडू देणार नसल्याचा इशारादेखील पालिकेने दिला आहे. त्यामुळे रॅपिड टेस्ट न करणाऱ्यांवर पालिका काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. 

हेही वाचा - काही खाजगी डॉक्टरांनी सहकार्याची भूमिका स्विकारली नाही, विभागीय आयुक्तांची खंत...

सोनपेठच्या बाधितांची संख्या आता सातवर 
सोनपेठ ः शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या आज दोनने वाढुन सात झाली आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. शहरातील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून येताच त्याच्या थेट संपर्कातील तब्बल सतरा नागरिकांना सोनपेठ येथील कोविड रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले होते. यातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये स्पष्ट झाले आहे. यामध्ये व्यापाऱ्याच्या कुटुंबातील दोन तर (ता.दहा) रोजी घेतलेल्या चाचणीत दोनजण बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. गेल्या चार दिवसात शहरातील एकूण सात जण कोरोना बाधित झाल्यामुळे स्थानिक प्रशासन आता चांगलेच धास्तावले आहे. शहरातील कोविड रुग्णालय तसेच यशोधरा आश्रम शाळा तसेच शेळगाव येथील नव्यानेच सुरू झालेले प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नागरिकांना विलगीकरण करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी दिली. तसेच शहरातील व्यापारी तसेच इतर महत्वाच्या नागरिकांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

परभणी जिल्हा (रात्री दहा वाजताची आलेली आकडेवारी)

एकूण पॉझिटिव्ह - ११९३
आजचे बाधित - ७१
आजचे मृत्यू - तीन 
उपचार सुरु असलेले - ६५३ 
उपचार घेत घरी परतलेले - ४८६
एकूण मृत्यू - ५४


संपादन ः राजन मंगरुळकर