
औंढा क्वारंटाइन सेंटर येथील एका ४२ वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनास गुरूवारी (ता.दोन) रात्री आठ वाजता प्राप्त झाला आहे. दररोज होत असलेल्या रुग्णांची वाढ पाहता नागरिकांची धाकधूक वाढली आहे. प्रशासन प्रयत्न करत असले तरी अनेकजण नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे.
हिंगोली : औंढा नागनाथ येथील क्वारंटाइन केलेल्या एका ४२ वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल गुरुवारी रात्री प्राप्त झाला आहे. सदर महिला ही भोसी येथील रहिवासी असून कोरोना संक्रमित तीन व्यक्तींसोबत एकाच वाहनातून मुंबईवरून परतली आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील भोसी गावातील गरोदर महिला जी कोरोना बाधित झाली होती, तिच्या कुटुंबातील व गावातील २९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच घोळवा येथील एका ७१ वर्षीय वृद्धाचा २८ जुलै रोजी हैदराबाद येथे मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटूंबातील व गावातील जवळच्या संपर्कातील ३२ जणांचे थ्रोट नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील ३१ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. व एक अहवाल रिजेक्ट आहे. तो पुन्हा तपासणीसाठी पाठविला जाणार आहे.
हेही वाचा - परभणीत रुग्ण आटोक्यात येईनात, आजपासून तीन दिवस संचारबंदीचे आदेश
दोघांना दिली सुट्टी
कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटर येथे दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील दोन्ही रुग्ण बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. गुरुवारी दोन रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून एक रुग्ण आढळला आहे.
हेही वाचा - स्थानिक गुन्हे शाखेतील तिन पोलिस कर्मचारी निलंबित
एकूण ३७ रुग्णांवर उपचार सुरु
आजघडीला जिल्ह्यात २७७ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी २४० रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर एकूण ३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. वसमत येथे तीन रुग्ण तर कळमनुरी केअर सेंटर येथे तेरा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कळमनुरी डेडीकेटेट येथे दोन रुग्ण आहेत. तसेच लिंबाळा येथे दहा, सेनगाव पाच, औंढा क्वारंटाइन सेंटर येथे चार रुग्ण भरती असून उपचार सुरू आहेत.
३६७ जणांचे अहवाल बाकी
जिल्ह्यात कोरोना सेंटर गावपातळीवर आयसोलेशन वॉर्ड येथे एकूण चार हजार ९२८ व्यक्तींना भरती केले असून चार हजार ३२३ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. चार हाजार दोनशे ४२ व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे. सद्यस्थितीला ६७८ व्यक्ती भरती असून ३६७ जणांचे अहवाल बाकी आहेत.