निसर्गाची साथ; पण कोरोनाने केला घात

tarbuj tamsa.jpg
tarbuj tamsa.jpg


तामसा, (ता.हदगाव, जि. नांदेड) ः जांभळा (ता. हदगाव) सारख्या दुर्गम भागात प्रथमच शेतामध्ये खरबूज लागवडीचा प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्याला निसर्गाने साथ दिली; पण कोरोना व्हायरस संकटामुळे मात्र उत्पादनाच्या बाबतीत घात झाल्याचा अनुभव तरुण शेतकऱ्यांना आला आहे. येथील तरुण शेतकरी दिग्विजय दिगंबरराव मस्के यांनी अडीच एकर शेतामध्ये पहिल्यांदाच जानेवारी महिन्यात खरबूज लागवड केली. खरबूज लागवडीवर शेतकऱ्याने अंदाजे दोन लाख रुपये खर्च केले आहे. सर्व प्रकारची काळजी घेताना निसर्गानेदेखील साथ केल्यामुळे एप्रिल महिन्यात खरबुजाचे उत्पादन जोमाने झाले. पण मार्च महिन्याच्या शेवटापासून कोरोनाव्हायरस संकट पसरले. 

त्यामुळे चांगल्या उत्पादनाची शक्यता असतानादेखील खरबूज विक्रीबाबत शेतकरी दिग्विजय यांची धाकधुकी व काळजी वाढली. एप्रिल महिन्यात खरबूज वजनाने चांगले भरले, चविष्ट बनले; पण कोरोनाव्हायरसमुळे शेतातच अडकले. तब्बल २२ ते २५ क्विंटल टरबुजाचे उत्पादन झाले. पण विक्रीसाठी बाहेर पडता आले नाही व खरेदीदारांनी लॉकडाउन व वाहनबंदीमुळे जांभळा येथे येऊन खरेदी करण्याचे टाळले. परिणामी तरुण शेतकऱ्याची चिंता वाढली, उमेद खचली. पण शेतातील खरबुजाचे करायचे काय? म्हणून शेतकऱ्याने तामसा येथे मिळेल त्या भावाने व नगाप्रमाणे खरबूज विकी चालू केली. खरबुजाला अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे लागवडीवरचा खर्च दोन लाख असताना खरबूज विक्रीतून प्रत्यक्षात मात्र, ६० ते ७० हजार रुपयांची मिळकत झाली. 

खरबूज सडण्याचे प्रमाण वाढले
त्यातही जांभळ्यावरून तामसा येथे टरबूज घेऊन जाणे व तीन तासांतच विकणे यामुळे शेतकऱ्यांच्या जिवाची प्रचंड घालमेल झाली. तीन तासांत खरबूज विक्रीची चिंता, पोलिसांचा मार मिळणार नाही याची भीती व काळजी अन् अपेक्षित भाव मिळण्याबाबतची अनिश्चितता, असा कष्टदायी प्रवास खरबूज विक्रीतून चालू आहे. खरबुजाच्या लागवडीचा खर्चदेखील निघणे मुश्कील असून खरबूज तोडनीसाठी मात्र गावातील रोजमजुरांना प्रत्येकी दोनशे रुपये मजुरी यानिमित्ताने मिळत आहे. शेतातील खाण्यायोग्य खरबुजाची विक्री होत नसल्यामुळे खरबूज सडण्याचे प्रमाण वाढत असून आठवड्यात अंदाजे पाच ते सहा क्विंटल सडलेले खरबूज फेकून द्यावे लागले आहे.


शेतात खरबूज लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला. पण ‘कोरोना’व्हायरस संकट शेतकऱ्यांच्या मुळावर आले आहे. खरबूज लागवडीचा खर्च भागणे मुश्कील असून दोन लाख रुपयांचा फायदा होण्याएवजी एक लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. कृषी विभागाचे कर्मचारी हाल अपेष्टा बघत नाहीत. परिणामी नुकसान भरपाईबाबत शासनाच्या मदतीपासून मी वंचित राहणार आहे. पण पुढच्या वर्षीही खरबूज लागवड करणार.
- दिग्विजय मस्के, खरबूज उत्पादक शेतकरी, जांभळा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com