esakal | परभणी महापालिकेच्या आरोग्य विभागात कोरोनाचा शिरकाव- तीन कर्मचाऱ्यांना बाधा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मंगळवारी (ता. 28) घेण्यात आलेल्या रॅपीड ॲन्टीजन टेस्ट मधून 23 पैकी तीन कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याची माहिती, आयुक्त देविदास पवार यांनी दिली.

परभणी महापालिकेच्या आरोग्य विभागात कोरोनाचा शिरकाव- तीन कर्मचाऱ्यांना बाधा

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात कोरोनाने शिरकाव केला असून मंगळवारी (ता. 28) घेण्यात आलेल्या रॅपीड ॲन्टीजन टेस्ट मधून 23 पैकी तीन कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याची माहिती, आयुक्त देविदास पवार यांनी दिली. शहरासह जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतच असून कोरोना बाधीतांची संख्या साडेपाचशेवर पोचली आहे. त्यामध्ये शहरातील शंभर पेक्षा अधिक रुग्णांचा समावेश आहे.

महानगरपालिकेने आरोग्यविभाग मलेरिया, स्वच्छता, अग्निशमन यासह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या रॅपिड ॲन्टीजन टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी (ता. 28) सीटी क्लब येथे येथे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या चाचण्या घेण्यास सुरवात झाल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांनी दिली. तर मंगळवारी आरोग्य विभागातील 23 कर्मचाऱ्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी तीन कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला अस आहे. त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांच्या कुटूंबांतील सदस्यांच्या देखील चाचण्या घेतल्या जाणार असल्याची माहिती आयुक्त श्री. पवार यांनी दिली.

हेही वाचा Good news : अकोला- अकोट स्थानकादरम्यान ब्रॉडगेज लाईन कार्यान्वित

कोरोना बाधीत व्यक्तींचा सातत्याने संपर्क

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अनेक कर्मचारी कोरोना कक्षात सेवा बजावत आहेत. तसेच विविध ठिकाणच्या विलगीकरण कक्षात देखील क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींची देखभाल करण्याचे काम त्यांच्यावर आहे. शहरात एखादा कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यास, त्यास व त्यांच्या कुटूंबीयास रुग्णालयात दाखल करणे, त्यांच्या तपासण्या करणे, प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरीकांच्या आरोग्य तपासण्या करण्याची जबाबदारी, या विभागातील परिचारीका, अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आलेली आहे. त्यातूनच त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट आहे.

व्यापाऱ्यांसह पथविक्रेत्यांची होणार टेस्ट

आयुक्त देविदास पवार म्हणाले की, पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या रॅपीड टेस्ट केल्या जाणार आहेत. परंतु त्यानंतर शहरातील पथविक्रेते, फेरीवाले, किराणा दुकानदार आदी व्यापाऱ्यांच्या देखील रॅपीड ॲन्टीजन टेस्ट केल्या जाणार आहे. त्याच बरोबर 50 वर्षावरील व ज्यांना मधुमेह, रक्तदाब, हृद्यविकार असे गंभीर आजार असलेली व्यक्ती स्वतःहून आली तर त्यांची देखील ही टेस्ट घेतली जाणार आहे. नागरीकांनी सामाजिक अंतर राखावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन देखील आयुक्त श्री. पवार यांनी केले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे
 

loading image