Latur Corona News
Latur Corona News

उंबरठा ओलांडला नाही तरी कोरोनाची लागण, कोरोनाबाधित रुग्णाने मांडली व्यथा

लातूर : जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी महिन्यात मोजून एक-दोन वेळा बाहेर गेलो असेन. त्याशिवाय, मी घराचा उंबरठाही कधी ओलांडला नाही. गेली १५-२० दिवस घरातच बसून आहे. गर्दीत सहभागी न होण्यापासून सॅनिटायझरच्या वापरापर्यंतच्या सर्व नियमांचे पालन केले आहे. असे असूनसुद्धा मला कोरोनाची लागण झाली आहे. ती कशी, याचाच विचार मी सध्या करत आहे... अशा शब्दांत शहरातील एका कोरोनाबाधित रुग्णाने आपली व्यथा मांडली.


लातूर जिल्ह्यात सात नवे कोरोनाबाधित रुग्ण शनिवारी (ता.३०) आढळून आले. यातील एक उदगीरमधील, तर सहा रूग्ण हे लातूर शहरातील आहेत. यात देसाई नगरमधील तीन, स्त्री रुग्णालयातील दोन आणि जिजामाता नगर (जिजाऊ सृष्टी) मधील एका रुग्णाचा समावेश आहे. स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिजामाता नगरमध्ये आढळून आलेल्या रुग्णाने ‘सकाळ’शी संवाद साधून आपली व्यथा मांडली.


मी परराज्यात गेलो नाही. मुंबई-पुण्यातून प्रवास करून शहरात आलो आहे, असेही नाही. मी मुळचा उदगीरमधील आहे. पण, उदगीरमध्येही गेल्या चार-साडेचार महिन्यांत गेलो नाही. मुलाच्या शिक्षणानिमित्ताने आम्ही सध्या लातूरातच राहत आहोत. मास्क बांधणे, सॅनिटायझर लावणे, हात वारंवार धुणे... अशा सर्व नियमांचे पालन आम्ही करत आहोत. घराबाहेर पडणेसुद्धा टाळत आलो आहोत. किराणा दुकानात तांदुळ आणण्यासाठी एकदा गेलो होतो. बाहेरून घरात आल्यानंतरही योग्य ती खबरदारी घेतली. इतके सगळे करूनही कोरोनाची लागण झाली आहे, असे संबंधीत रुग्णाने सांगितले.


याआधी मी एका बँकेतील ग्राहक सेवा केंद्रात काम करत होतो. पण, काम बंद करूनही बरेच दिवस झाले. गेल्या आठ दिवसांपासून ताप असल्याने शहरातील एका खासगी रुग्णालयात गेलो. तिथे निमोनिया झाल्याचे मला सांगण्यात आले. निमोनियावर उपचार करायचे असतील तर आधी कोरोनाची तपासणी करावी लागेल, असेही मला सांगितले गेले. त्यामुळे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय विज्ञान संस्थेत आलो. येथे स्वॅब घेतले. त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com