रस्ते अडवूनही कोरोना सुसाट, लातूर जिल्ह्यातील सोळा गावांत रुग्ण

Latur Corona Updates, Latur
Latur Corona Updates, Latur

लातूर  : मुंबई-पुण्यासह परराज्यातून नागरिक थेट गावात येऊ नयेत म्हणून रस्ते अडविले असले किंवा गावांच्या वेशीवर अँटी कोरोना फोर्स नेमलेली असली तरी जिल्ह्यात आतापर्यंत १६ गावांत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. रविवारी (ता. २४) ११ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्ह्याची वाटचाल आता शंभरीच्या उंबरठ्यावर आहे.


परजिल्ह्यातून, परराज्यातून अनधिकृतपणे नागरिक थेट आपल्या गावांत, शहरात येऊ नयेत म्हणून जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. याबरोबरच अँटी कोरोना फोर्स गावागावांत नेमण्यात आली आहे. गावात जाणारे रस्ते वेगवेगळ्या पद्धतीने अडविण्यात आले आहेत. असे असले तरी आता कोरोना शहर, तालुक्यांपाठोपाठ गावांत पोचला आहे. मुंबई आणि परराज्यातून आलेल्या नागरिकांमुळेच कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्याचा बाधितांचा आकडा शंभरीच्या घरात पोचला आहे. एकट्या उदगीर तालुक्यात कोरोनाने पन्नाशी गाठली आहे.


जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव प्रथम निलंगा येथे झाला. त्यानंतर उदगीरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले. टप्प्याटप्प्याने उदगीर तालुक्यातील कासराळ, चिमाची वाडी, बोरताळ तांडा, लोणी, सोमनाथपूर, हंगरगा या गावांत रुग्ण आढळले. निलंगा तालुक्यातील कोराळी, लांबोटा, कासारशिरसी या गावांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दिसले. लातूर शहराबरोबरच लातूर तालुक्यातील बोरगाव काळे, अहमदपूर तालुक्यातील मांडणी, खंडाळी, पाटोदा, जळकोट तालुक्यातील गव्हाण, रेणापूर तालुक्यातील पानगाव, चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ गावांत रुग्ण सापडले. दरम्यान, जिल्ह्यात बधितांची एकूण संख्या सोमवारी (ता. २५) दुपारपर्यंत ९४ होती. यापैकी ५५ जणांवर उपचार सुरू असून बरे झालेल्या ३६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. यापूर्वी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

‘एसबीआय’चे क्षेत्रीय कार्यालय लातूरलाच ठेवा, अर्थमंत्र्यांना साकडे

रुग्णांचे मुंबई कनेक्शन
मुंबईहून लातुरात आलेल्या सहा वर्षांच्या मुलीचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल शनिवारी (ता. २३) आला. तिच्या कुटुंबातील मुंबईहून आलेल्या आणखी चार जणांचा अहवाल रविवारी (ता. २४) पॉझिटिव्ह आला. याच दिवशी उदगीरमधील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पाचपैकी चार व्यक्ती या कासराळ (ता. उदगीर) येथील आहेत. त्या चिमाचीवाडीतील रुग्णाच्या संपर्कात आल्या होत्या. उर्वरित एकजण मुंबईवरून उदगीरला आला आहे. अहमदपूर येथील २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या दोनही व्यक्ती मांडणी (ता. अहमदपूर) येथील असून त्या मुंबईहून प्रवास करून मांडणीत आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com