निलंगा तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ, आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू

राम काळगे
Saturday, 26 September 2020

निलंगा तालुक्यात कोरोनाचा कहर सुरु आहे.

निलंगा (जि.लातूर) : कोरोनाचा कहर वाढत असून निलंगा शहर व तालुक्यात आतापर्यंत ५४ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. स्थानिक स्वराज संस्था प्रशासनामध्ये समन्वय नसल्यामुळे रुग्ण संख्येची मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. गर्दीच्या ठिकाणी शहरांमध्ये आणि नागरिक विनामास्क फिरत असून शारीरिक अंतराचा फज्जा उडत आहे.

निलंगा शहरासह तालुक्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अँटिजेन टेस्टमुळे तपासणीची संख्या अधिक होत असून रुग्ण संख्याही वाढत चालली असून शारीरिक अंतर, नाका तोंडावरती मास्क, अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, अशा सूचना असतानाही सर्रासपणे नागरिक घराबाहेर पडत आहेत.

पिकांचे त्वरित पंचनामे करुन अहवाल सादर करा, राज्यमंत्री बनसोडे यांचे निर्देश

मागील आठ दिवसांपासून वातावरण दमट असल्यामुळे व पाऊस पडत असल्याने सर्दी, ताप खोकल्याचे रूग्ण वाढत आहेत. शिवाय असे लक्षणे असतानाही नागरिक तपासणी करण्याकडे पाठ फिरवत आहे. ग्रामीण भागातील एखादा रूग्ण कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या घरातील जवळच्या व्यक्तीच्या तपासण्या करण्यासाठी तीन-चार दिवस लागत आहेत.

त्यामुळे संबंधित व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येत असल्याने संसर्गाचा फैलाव वाढत आहे. ज्या गावांत रूग्ण आढळला तेथे फवारणी केली जात नाही अथवा मास्क वापरण्याची सक्ती केली जात नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतींमध्ये समन्वय नसल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. निलंगा शहरांमध्ये आतापर्यंत ३६७, तर ग्रामीण भागात ९८० असे एकुण एक हजार ३५७ जणांना कोरोना झाला आहे. यापैकी एक हजार ९२ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

आजपर्यंत शहर तालुका मिळून दोनशे सात कोरोना रुग्ण विलगीकरण कक्षात आहेत. शहरात १८, तर ग्रामीण भागात ३६ असे एकुण ५४ रूग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा कहर वाढत चालला आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सध्या पाऊस व थंडीचे वातावरण असल्यामुळे सर्दी खोकला तिच्या रूममध्ये वाढल्याचे दिसत असून ग्रामीण व शहरातील रुग्णालयात लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत संख्या अधिक दिसत आहे.

पिकांचे त्वरित पंचनामे करुन अहवाल सादर करा, राज्यमंत्री बनसोडे यांचे निर्देश

माझे कुटूंब माझी जबाबदारीसाठी प्रशासन उदासीन
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांची ही तितकीच काळजी आहे. त्यानुषंगाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना शासनाने सुरू केली आहे. आपल्या कुटुंबाचे आपणच काळजी घेण्यासाठी घरातील प्रमुख व्यक्तीने याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी स्वतःबरोबरच कुटुंबाची काळजी घेण्यासाठी दक्ष राहण्याची गरज आहे. मात्र शासनाने ज्या उद्देशाने ही संकल्पना काढली. याबाबत तालुका प्रशासनात फारसे गंभीर दिसत नाही.

या योजनेबाबत तालुका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्य झाले नाही. शिवाय शहरासह ग्रामीण भागातील याबाबतची जनजागृती त्यांच्याकडून करण्यात आली नाही. त्यामुळे शासनाच्या या संकल्पनेला तालुका प्रशासनाकडून छेद देण्यात आला असल्याचे दिसत आहे. नगरपालिका व ग्रामपंचायती यांना माझ्या कुटुंबाची जबाबदारी बाबत कोणतीही सूचना अथवा जनजागृती बाबतच्या बैठका घेऊन या संकल्पनेवर जोर देण्यात आल्याचे दिसत नाही.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Positive Patients Number Increases In Nilanga Taluka