जालन्यात तीनजण कोरोनामुक्त 

संग्रहित चित्र.
संग्रहित चित्र.

जालना - डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे उपचार घेतलेले तीनजण कोरोनामुक्त झाले, तर जिल्ह्यात दोन नवीन कोरोना रुग्णांची शनिवारी (ता.२३) भर पडली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ५४ झाली आहे.

नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये एक खासगी हॉस्पिटलचा कर्मचारी असून, दुसरा रुग्ण मुंबईवरून जाफराबाद तालुक्यातील हिवरा काबली येथे आला होता, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. 

जिल्ह्यात शुक्रवारी आठ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना रुग्णांची संख्या पन्नाशीच्यावर गेली. त्यात शनिवारी पुन्हा दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 
यातील एक नवीन जालना भागातील खासगी हॉस्पिटलचा कर्मचारी आहे. विशेष म्हणजे याच हॉस्पिटलमधील दोन डॉक्टर व सहा कर्मचारी यापूर्वी पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. दुसऱ्या रुग्णाचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे, तो जाफराबाद तालुक्यातील हिवरा काबली येथे आला होता. आतापर्यंत ५४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी १३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सध्या रुग्णालयात ४१ जणांवर उपचार सुरू आहेत. 

शहरातील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले. शनिवारी या रुग्णांचे दुसऱ्यांदा पाठवलेली स्वॅब नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यातील एक रामनगर (ता.जालना), परतूर तालुक्यातील एक आणि राज्य राखीव दलातील एका जवानाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राठोड यांनी दिली आहे. 

जिल्ह्यात ४४४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात विविध ठिकाणी ४४४ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. सध्या संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या ठिकाणांमध्ये जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्‍टेलमध्ये २६, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात ११, मोतीबाग येथील वसतिगृहात २६ व पोलिस प्रशिक्षण केंद्रात ४५ व्यक्ती अलगीकरणात आहेत. जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालयात ४, जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये ६१ तर टेंभुर्णीतील राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल येथे १०८ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. अंबड तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेलमध्ये २३ तर शासकीय मुलींच्या वसतिगृहात १८ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. घनसावंगीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेलमध्ये ४५ तर अल्पसंख्याक गर्ल्स हॉस्टेलमध्ये ३७ व्यक्तींचे अलगीकरण केले आहे. भोकरदन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये एक, मंठा येथील मॉडेल स्कूलमध्ये ३७ व्यक्तींचे तर बदनापूर येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात दोन व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com