जालन्यात कोरोनाच्या विळख्यात चौदा जण 

महेश गायकवाड
Sunday, 14 June 2020

शहरातील मंगळबाजार परिसरातील पंचवीस वर्षीय व्यक्तीने कोरोनावर मात केली असून त्याला शनिवारी (ता.१३) रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर दिवसभरात नवीन चौदा संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

जालना - कोविड हॉस्‍पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या शहरातील मंगळबाजार परिसरातील पंचवीस वर्षीय व्यक्तीने कोरोनावर मात केली असून त्याला शनिवारी (ता.१३) रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर दिवसभरात नवीन चौदा संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा २६९ झाला आहे. 

शासनाने लॉकडाउन शिथिल केल्यानंतर जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी (ता.१२) २६ व्यक्ती बाधित आढळून आल्यांनतर शनिवारी पुन्हा चौदा संशयितांचा अहवाल कोरोनाचा पॉझिटिव्ह आला.

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

जालना शहरातील मंगळबाजार येथील पंचवीस वर्षीय व्यक्तीवर यशस्‍वी उपचार करण्यात कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश आले आहे. त्याच्या सलग दुसऱ्या स्‍वॅब नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

नव्याने बाधित आढळून आलेल्या चौदा रुग्णांमध्ये राज्य राखीव दलातील चार जवान, शहरातील उतारगल्लीतील पाच, कादराबाद परिसरातील एक व बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथील चार व्यक्तींचा समोवश आहे. 

जिल्ह्यातील एकूण आठ रुग्णांचा मृत्यू 

जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या २६९ कोरोनाबाधितांपैकी आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १५० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या रुग्णालयात १११ रुग्णांवर उपचार सुरू असून यातील सहा रुग्णांना औरंगाबादमधील हॉस्पिटलमध्ये संदर्भित करण्यात आले आहे. 

जिल्ह्यात ४६३ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकूण ४६३ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यामध्ये जालना शहरातील संत रामदास वसतिगृहात ३९, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये १४, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात २६, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात २६, पोलिस प्रशिक्षण केंद्रात १९३, परतूर येथील कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहात १०, जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालयात ७, जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये ३४, पंचगंगा मंगल कार्यालयात ११ व स्वामी दयानंद सागर विद्यालयात २२ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. अंबडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहात ३३ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये ५, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये ८ व अल्पसंख्याक गर्ल्स हॉस्टेलमध्ये २१, मंठा येथील मॉडेल स्कूलमध्ये ८, तर कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहात १५, बदनापूर येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात १ व्यक्तीचे अलगीकरण करण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna