जालना जिल्ह्यात नव्याने ६७ पॉझिटिव्ह 

उमेश वाघमारे 
Saturday, 15 August 2020

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ सुरूच आहे. शुक्रवारी (ता.१४) दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात पुन्हा नव्याने ६७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

जालना - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ सुरूच आहे. शुक्रवारी (ता.१४) दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात पुन्हा नव्याने ६७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. परिणामी जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल तीन हजार ४२० झाली आहे. दरम्यान, ६४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत दोन हजार १२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १०७ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख आता चिंतेत भर घालणारा ठरत आहे. कारण मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून प्रत्येक दिवसाला नवीन कोरोनाबाधितांची संख्या ही शंभरीपार होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढीचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. मात्र, तरीदेखील मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी कायम होत आहे. त्यात आता जालना शहरातही पान स्टॉलसह हॉटेलही खुले झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा विळखा कमी होण्याची चिन्हे नाहीत.

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

उपचार सुरु असलेल्या दोन कोरोनाबाधितांचा शुक्रवारी मृत्यू झाला. यात परतूर शहरातील ६८ वर्षीय पुरुष व परभणी शहरातील कल्याणनगर येथील ७२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. परिणामी आतापर्यंत कोरोनाने १०७ जणांचा जीव गेला आहे. तर ६७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल तीन हजार ४२० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून सध्या एक हजार १९२ जणांवर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यातील ६४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये भोकरदन येथील सात जण, जालना शहरातील लक्ष्मीनगर येथील सहा जण, भवानीनगर व मंठा शहरातील येथील प्रत्येकी चार जण, वडीगोद्री (ता. अंबड) व अंबड शहर येथील प्रत्येकी तीन जण, अंबड तालुक्यातील शहागड, गोंदी, जालना शहरातील संभाजीनगर, कन्हैयानगर, भाग्योदयनगर, अयोध्यानगर, साईनाथनगर येथील प्रत्येकी दोन जण, लक्ष्मीनारायणपुरा, राज्य राखीव पोलिस बल, क्रांतीनगर, सुभेदारनगर, स्वामी समर्थ नगर, नूतन वसाहत, तिरंगा कॉलनी, म्हाडा कॉलनी, कादराबाद, माऊलीनगर, शांतीनगर, जमुनानगर, अंकुशनगर (ता. अंबड), परतूर शहर, शेलगाव (ता. बदनापूर), सिरसवाडी, सिंदखेडराजा, खासगाव, खाणेपुरी, वरूड, दरेगाव, अंबड शहर, साडेगाव येथील प्रत्येकी एकजण कोरोनामुक्त झाला आहे. परिणामी आतापर्यंत दोन हजार १२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna