ग्रामीण भागातही पसरतोय कोरोना !

गणेश पांडे
मंगळवार, 30 जून 2020

राज्यातील महानगरांतसह अनेक शहरांत पसरलेला कोरोना आता ग्रामीण भागातही आपले पाय पसरवतो आहे. कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी परभणी शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ११५ कोरोना पॉझिटिव्हची नोंद झाली आहे. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे.

परभणी : आतापर्यंत दाट वस्तीच्या व शहरी भागात कोरोनाचे रुग्ण सापडत होते. परंतु, आता ग्रामीण भागातही कोरोनाने पाय पसरवायला सुरवात केली असून झरी (ता. परभणी) सारख्या ग्रामीण भागात सलग दोन दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे आता कोरोना ग्रामीण भागातही वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील महानगरांतसह अनेक शहरांत पसरलेला कोरोना आता ग्रामीण भागातही आपले पाय पसरवतो आहे. कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी परभणी शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ११५ कोरोना पॉझिटिव्हची नोंद झाली आहे. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे.
परभणी तालुक्यातील पिंपळगाव (एक), कारेगाव (दोन), असोला (एक), माळसोन्ना (एक), जांब (एक), पाथरा (एक) व झरी (चार) असे कोरोनाचे रुग्ण या खेडेगावात आढळून आले आहेत. जिंतूर तालुक्यातील शेवडी (चार), सावंगी भांबळे (तीन), मालेगाव (एक), वाघी बोबडे (एक), डोंगरतळा (एक) रुग्ण सापडलेले आहेत. सोनपेठ तालुक्यातील शेळगाव (आठ), खपाट पिंपरी (एक) या दोन खेडेगावांत रुग्ण सापडलेले आहेत. पूर्णा तालुक्यात माटेगाव (नऊ), कमलापूर (एक), गंगाखेड तालुक्यातील नागठाणा (सहा), माखणी (आठ), मैराळ सावंगी (एक), सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी (दोन), देवगावफाटा (एक), चिकलठाणा (एक) असे रुग्ण सापडलेले आहेत. यापैकी सावंगी भांबळे, वाघी बोबडे (ता.जिंतूर) येथील प्रत्येकी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोना हळूहळू वाढतो आहे. जिल्हा प्रशासनाने अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. तर नागरिकांनी स्वतःची सुरक्षा स्वत: करण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा व पहा :​ व्हिडीओ : पेरणीसाठी पती-पत्नीने ओढले सरते !

कामाशिवाय घराबाहेर पडू नका
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर निघू नये. तोंडाला मास्क लावावा. दोन व्यक्तींमधील अंतराचा नियम पाळणे आवश्यक आहे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

परभणीत परत तीन पॉझिटिव्ह
परभणी : सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. ३०) परभणी शहरासह झरी गावात एकूण तीन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे परभणीकरांची धडधड वाढली आहे. आता जिल्ह्यात ११५ रुग्ण संख्या झाली आहे. परभणी शहरात गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येण्यास सुरवात झाली आहे. परभणी जिल्ह्यात चौथ्या लॉकडाउननंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्यास सुरवात झाली आहे. पुणे, मुंबईसह इतर मोठ्या शहरांतून परभणी परतलेल्या नागरिकांच्या माध्यमातून ही कोरोनाची लागण जिल्ह्यात पसरली असल्याची बाब समोर आलेली असली तरी आता परभणीत येऊन गेलेल्या काही पाहुण्यांमुळेदेखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी (ता.२९) एकाच दिवशी झरी (ता.परभणी) येथे तीन, तर परभणी शहरात एक, असे चार रुग्ण आढळून आले होते. सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. ३०) परभणी जिल्ह्यात परत तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यात परभणी शहरातील काद्राबाद प्लॉट व रामकृष्णनगर या दोन परिसरात दोन रुग्ण आढळून आले आहेत. तर झरी (ता. परभणी) येथील राजपुत लेन भागातील एक व्यक्ती आहे. या तीन रुग्णांना परभणी येथील कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आता रुग्ण संख्या ११५ एवढी झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona is spreading in rural areas too ! Parbhani News