esakal | लातूर : कोरोनामुळे आरोग्य केंद्रांतील सुविधांचे बळकटीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णवाहिका.jpg
  • लातूरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळणार रुग्णवाहिका 
  • जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा पुढाकार. 

लातूर : कोरोनामुळे आरोग्य केंद्रांतील सुविधांचे बळकटीकरण

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : कोरोनानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील सुविधांचे बळकटीकरण होत आहे. सर्व केंद्रांसह उपकेंद्रात ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यापुढे जाऊन आता प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. यामुळे सुरवातीला पंचवीस आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध होण्याची आशा असून, उर्वरित केंद्रांसाठीही लोकप्रतिनिधींनी हमी दिल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोनानिमित्त संसर्गजन्य आजारावरील उपचाराच्या सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपलब्ध करण्याचे गरज पुढे आली. यामुळे कोरोना व यापुढील काळात येणाऱ्या संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांवरील उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून सर्वच केंद्रांचे बळकटीकरण करण्याची संकल्पना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मांडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व डॉ. परगे यांनी ही संकल्पना तडीस नेण्यासाठी नियोजन केले. काही सुविधांसाठी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध केला. यासाठी आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींनी प्रतिसाद देऊन साहित्य दिले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यातून कोट्यवधी रुपये किमतीचे साहित्य उपलब्ध झाले. त्यानंतर पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून एक कोटीहून अधिक निधी दिला. यामुळे प्रत्येक आरोग्य केंद्रात सध्या ऑक्सिजनचे पाच सिलिंडर व उपकेंद्रात एक सिलिंडर उपलब्ध झाले आहे. लाइन टाकून ऑक्सिजनयुक्त बेडचीही उपलब्धता होणार आहे. केंद्रात सध्या ईसीजी मशीन, दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, एक रेडीएन्ट वार्मर उपलब्ध असून, दहा केंद्रात एक बायपॅप मशीन देण्यात आली आहे. सेमी फाउलर बेड, फोम गाद्या, आयव्ही स्टॅन्ड, बेड साइड लॉकर, डिलिव्हरी टेबल, थर्मल गण, पल्स ऑक्सीमीटर, वॉटर कूलर विथ प्युरिफायर, रेवोलविंग स्ट्रल, एक्स रे विव्हिंग स्क्रीन देण्यात आली आहे. काही दिवसांत सर्व केंद्रात एक्स-रे मशीन व बायपॅप मशीन देण्याचे नियोजन आहे. उपकेंद्रांसाठी एक डिलिव्हरी टेबल, एक कॉट गादी, बेड साइड लॉकर, आयव्ही स्टॅन्ड, संगणक प्रिंटर, वॉटर प्युरिफायर, पाच स्टेथोस्कोप, बीपी, थर्मल गन, पल्स ऑक्सीमीटर, फेस शील्ड, हेवी ड्यूटी ग्लोज आदी साहित्य दिल्याचे डॉ. परगे यांनी सांगितले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सर्वच केंद्रांसाठी रुग्णवाहिका 
आरोग्य केंद्र बळकटीकरणाच्या प्रयत्नात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने सर्व केंद्रांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत. यात राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पाच व आमदार धीरज देशमुख यांनी तीन रुग्णवाहिका देण्याची हमी दिली आहे. जिल्ह्यातील भाजपचे खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार व आमदार रमेशअप्पा कराड हे लोकप्रतिनिधी मिळून वीस ते २१ रुग्णवाहिका देणार आहेत. आणखी लोकप्रतिनिधींचेही सहकार्य मिळणार सर्व केंद्रांसाठी रुग्णवाहिका आणि संगणक सुविधाही उपलब्ध करण्याचे प्रयत्न असल्याचे डॉ. परगे यांनी सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)