उस्मानाबादेत कोरोनाचा नवीन रुग्ण, टरबूज विक्रीसाठी गेला होता मुंबईला

तानाजी जाधवर
Monday, 11 May 2020

जिल्ह्यातील तीन जण कोरोनामुक्त झाल्यानंतर तब्बल ३८ दिवसानंतर कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला आहे. परंडा तालुक्यातील एका युवकाचा अहवाल पॉझीटीव्ह आला असून, तो मुंबई, पुणे येथे प्रवास करुन परतला होता.

उस्मानाबाद : जिल्ह्यातील एका युवकाचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आला आहे. परंडा तालुक्यातील सरणवाडीतील एका युवकाला कोरोनाची लागन झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली. जिल्ह्यातील तीन जण कोरोनामुक्त झाल्यानंतर तब्बल ३८ दिवसानंतर कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला आहे. आजपासूनच लॉकडाऊनमधून शिथीलता देण्यात आली होती. मात्र एक रुग्ण आढळल्याने प्रशासकीय पातळीवरही त्याचा परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यामध्ये दोन व तीन एप्रिल रोजी तीन जणांना कोरोनाची बाधा झाली होती. उमरगा तालुक्यातीलच हे तिन्ही रुग्ण होते. जिल्ह्याच्या इतर भागामध्ये सुदैवाने कोरोनाचा फैलाव झालेला नव्हता. शिवाय ते तीनही रुग्ण बरे होऊन गेल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये कोरोनाचा रुग्ण सापडलेला नव्हता. त्यामुळे नागरीकही निर्धास्त झाले होते, आता मात्र जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला असून, मागील महिनाभर कोरोनाच्या हाती न लागलेल्या परंडा तालुक्याने खाते उघडले आहे.

हेही वाचा - ‘साहेब, तुमच्या पाया पडतो; पण एक वेळ सोडा हो...’

तालुक्यात कोरोनाने खाते उघडल्याने त्या भागामध्ये भितीचे वातावरण पसरले असुन त्याचा चांगलाच धसका जिल्ह्यामध्येही घेतल्याचे दिसुन येऊ लागले आहे. मुंबई, पुणे येथे प्रवास केलेल्या परंडा तालुक्यातील सरणवाडी येथील तीस वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गलांडे यांनी दिली आहे. शेतातील कलिंगड व खरबुज विक्रीसाठी तो वाशी व नवी मुंबई येथे जात होता. विक्री करुन गावाकडे परतलेल्या त्या युवकाला ताप येवू लागल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मुंबईला प्रवास केलेला असल्याने हॉस्पीटल प्रशासनाकडून त्याची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज अहवाल प्राप्त झाला असून, तो युवक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्याचे काम तातडीने सुरु करण्यात आल्याची माहिती डॉ. गलांडे यांनी दिली आहे. 

उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने शहरासह जिल्ह्यातील दुकाने सोमवारपासून (ता. ११) सकाळी नउ ते दुपारी दोनपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. मात्र बाजारापेठेत गर्दी वाढू लागली होती. त्यातच या युवकाचा अहवाल पॉजिटिव्ह आल्याने परंडा तालुका हादरला आहे. 
....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's new patient in Osmanabad had gone to Mumbai to sell watermelon