esakal | चकाट्या पिटणाऱ्यांना असाही पायबंद, गावच्या पारालाच फासले डांबर
sakal

बोलून बातमी शोधा

बीड जिल्ह्यातील एका गावच्या पाराला फासलेले डांबर

कोरोना विषाणूचा संसर्ग गर्दीमुळे होतो. यामुळे संचारबंदी आणि जमावबंदी लागू केली आहे. पण अनेक गावांतील लोकांनी यात पुढाकार घेत आपापल्या पातळीवर उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. द

चकाट्या पिटणाऱ्यांना असाही पायबंद, गावच्या पारालाच फासले डांबर

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड -  कोरोना विषाणूच्या संसर्गाचा उद्रेक रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात येणाऱ्या रस्त्यांवर चेकपोस्टच्या माध्यमातून तपासणी करण्यात आलेल्यांची संख्या आता ४२ हजार झाली आहे. 
दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर नोकरी, कामाला असलेल्या पुणे, मुंबई, अहमदनगर, नाशिक आदी जिल्ह्यांतून जिल्ह्यात येणाऱ्यांचा लोंढा वाढला होता. त्यांची सर्व माहिती प्रशासनाकडे असावी यादृष्टीने जिल्ह्यात येणाऱ्या रस्त्यांवर १४ चेकपोस्टची उभारणी करून २४ तास वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांच्या सहभागाने तपासणी करण्यात येत आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात येणाऱ्या ४२ हजार १३१ व्यक्तींची तपासणी केली आहे. तपासणीदरम्यान लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना वैद्यकीय सुविधा दिल्या जात आहेत. जिल्ह्यात कोरोनावरील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालय आणि अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येकी २५ खाटांची व्यवस्था असलेला एकेक आयसोलेशन वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. याचबरोबर क्वारंटाइनची आवश्यकता भासल्यास ७०० खाटांची व्यवस्था असलेले ११ कक्ष जिल्हाभरात सज्ज आहेत.

 हेही वाचा -  अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरातील दर्शन बंद, फक्त पुजाऱ्यांना प्रवेश

होम क्वारंटाइनची संख्या घटली 
परदेशातून आलेल्या व्यक्तींना त्यांच्यात घरात अलगीकरण (होम क्वारंटाइन) करण्यात आले असून अशांची संख्याही आता ५९ वरून केवळ १९ झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली. कोरोना संसर्गाने बाधित झालेल्या १२ देशांतील १५ व्यक्तींचा तर इतर देशांतून आलेल्या चार व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. सदर नागरिक स्पेन, फ्रान्स, यूएई, कतार, ओमान व अमेरिका आदी देशांतून आलेले आहेत. बुधवारपर्यंत (ता. २५) कोरोना आजाराच्या तपासणीसाठी जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या आठ स्वॅब नमुन्यांपैकी सर्व नमुने अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. 

हेही वाचा - कोरोना इफेक्ट - साखरपुड्यात विवाह उरकून एक लाख दिले मुख्यमंत्री निधीत

ग्रामस्थांचीही सतर्कता; गर्दी टाळण्यासाठी क्लृप्त्या 
कोरोना विषाणूचा संसर्ग गर्दीमुळे होतो. यामुळे संचारबंदी आणि जमावबंदी लागू केली आहे. पण अनेक गावांतील लोकांनी यात पुढाकार घेत आपापल्या पातळीवर उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. दहिफळ वडमाऊली व नांदूरघाट (ता. केज), आवरगाव (ता. धारूर), दासखेड (ता. पाटोदा), मोरजळवाडी (ता. शिरूर), देवठाणा (ता. धारूर) येथील नागरिकांनी गावात येणारे रस्तेच अडविले आहेत. तर, पुणे-मुंबईहून परतलेल्यांना ओळखता यावे यासाठी आवरगाव (ता. धारूर) येथे अशा लोकांच्या डाव्या हाताला रंग लावून घराबाहेर पडू नका, अशा सूचना दिल्या जात आहेत. तर, आंबेसावळी (ता. बीड) येथे संचारबंदीत बाहेर पडून पारावर गप्पांचे फड रंगू नयेत म्हणून पाराला डांबर फासले आहे. 

loading image