बीडकरांना फुकटच टेन्शन : अगोदर त्या तबलीगींमुळे आता परभणीवाल्यामुळे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

परभणीत आढळलेला पहिला कोरोनाग्रस्त पुण्याहून परभणीला जाताना मातोरी (ता. शिरुर कासार) येथील संपर्कात आलेल्या पोलिस व इतर शासकीय कर्मचाऱ्यांसह दोन ग्रामस्थांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवावे लागले आहेत.

बीड : कोराना विषाणू रोखण्याच्या लॉकडाऊन, संचारबंदी उपाय योजनांची प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी व नागरिकांकडूनही त्याचे पालन झाल्याने कोरोना अद्याप तरी बीडची हद्द पार करुन शकला नाही. परंतु, बीडकरांचे टेन्शन बाहेरच्यांमुळे वाढत आहे. यापूर्वी तेलंगणातील तबलीगींमुळे, तर आता परभणीच्या त्या कोरोनाग्रस्तामुळे बीडकरांचे टेन्शन वाढले आहे. 

परभणीत आढळलेला पहिला कोरोनाग्रस्त पुण्याहून परभणीला जाताना मातोरी (ता. शिरुर कासार) येथील संपर्कात आलेल्या पोलिस व इतर शासकीय कर्मचाऱ्यांसह दोन ग्रामस्थांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवावे लागले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत फक्त एकालाच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असले, तरी त्याची तपासणी नगरला होऊन उपचारही तिथेच सुरु आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अद्याप तरी कोरोनाचा रुग्ण नाही. 

जिल्ह्यात आतापर्यंत १२९ जणांच्या स्वॅबची तपासणी केली असून, सर्वांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. यातील १३ जणांची फेर तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, यापूर्वी तेलंगणातील तबलीगी जमातचे १२ जण औरंगाबादहून लातूरला जाताना त्यांचा चेकपोस्टवरील पोलिस, शिक्षक आणि आरोग्य सेवकांशी संपर्क आला होता. या १२ पैकी आठ तबलीगींना कोरोनाचे लातूरमध्ये निदान झाले. त्यामुळे बीडच्या पोलिस, शिक्षक व आरोग्य सेवक अशा ३३ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करुन त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले.

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

अख्ख्या बीडकरांचे टेन्शन यामुळे वाढले होते. परंतु, त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला होता. आता, परभणीत आढळलेला पहिला कोरोनाग्रस्तही पुण्याहून परभणीला जाताना त्याचा शिक्षक, पोलिस, कृषी कर्मचाऱ्यांशी संपर्क आला. त्यामुळे १२ जणांना पुन्हा विलगीकरण कक्षात दाखल करुन त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaVirus Covid-19 Fear In Beed Marathwada News